नाशिक : हॉटेल गंमत-जंमतजवळ भीषण अपघात; युवती ठार तर 6 जखमी

नाशिक (रामदास नागवंशी) :- बर्थडे पार्टीकरून नाशिककडे परतताना हॉटेल गंमत-जंमत जवळ असलेल्या एका भिंतीवर गाडी आदळून झालेल्या भीषण अपघातात एक युवती ठार तर सहा जण जखमी झाले आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, काल सायंकाळी एका बर्थडे पार्टीवरून तीन युवक व चार युवती असे सात जण मारुती इर्टिगा कार (क्र.एम.एच.15/ ईएक्स 0949) या गाडीने नाशिककडे परतत होते. गाडी भरधाव वेगात असल्याने चालकाला वळणाचा अंदाज न आल्याने वळणावरील भिंतीवर गाडी जोरदार आदळली.

गाडीमध्ये हेमंत कमलाकर गायकर (वय 20), वैष्णवी मंडळकर (वय 30), तन्वीर निसार मन्सूरी (वय 22, रा. पखालरोड), विकास हातांगळे (वय 20), नेहा असरलाल सोनी (वय 18), आतिश किशोर छिडे (वय 20) व कोमल ओमप्रकाश सिंग (वय 18) हे सात जण गाडीतून परतत होते.

अपघातात कोमल ओमप्रकाश सिंग (वय 18, रा. पाईपलाईन रोड, नाशिक) या युवतीला डोक्याला व छातीला जबर मार लागल्याने तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. इतर सहा जणांनाही डोक्याला जबर मार लागल्याने काहींवर खासगी रुग्णालयात तर काहींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या अपघातात गाडीचा चक्काचूर झाला आहे.

घटनेची माहिती मिळताच नाशिक तालुका पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. याप्रकरणी नाशिक तालुका पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!