निफाड (वार्ताहर) :– निफाड -पिंपळगाव या मार्गावरील मटन मार्केटच्या समोर उसाचा ट्रॅक्टर आणि मोटर सायकल यांच्यात आज सकाळी साडे दहाच्या दरम्यान अपघात होऊन मोटरसायकलस्वार जागीच ठार झाला आहे. याबाबत निफाड पोलिसांनी अपघाताचा गुन्हा दाखल केला आहे.

निफाड पोलिसाकडून कळालेली सविस्तर माहिती अशी की, निफाड-पिंपळगाव या मार्गावर दररोज भाजीपाला विक्रेते आपला भाजीपाला विक्रीसाठी घेऊन बसतात. त्यामुळे या रस्त्याने वैनतेय विद्यालय ते मटन मार्केट पर्यंत वर्दळीचे ठिकाण झाले आहे.

या रस्त्याने दुचाकी व अन्य वाहनांना रस्त्याने जा- ये करण्यास मोठा त्रास सहन करावा लागतो आणि याच वर्दळीच्या ठिकाणी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास मटन मार्केट समोर उसाच्या भरलेला ट्रॅक्टर क्रमांक एम.एच ४१ टी २३२० आणि मोटरसायकल क्रमांक एम.एच.१५ एफ.एक्स ४९१० यांच्यात अपघात होऊन अपघातात मोटरसायकलस्वार दिपक पोपट गांगुर्डे (वय ४३) हा ट्रॅक्टरच्या चाकाखाली आल्याने तो जागीच ठार झाला.
याबाबत अंबादास नभु गांगुर्डे यांनी निफाड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून याबाबत पुढील तपास पोलीस निरीक्षक रंगराव सानप यांच्या मार्गदर्शनाखाली निफाड पोलीस करीत आहे.