‘बंटी-बबली’कडून 12 उच्चशिक्षित तरुणांना 68 लाखांचा गंडा

नागपूर (भ्रमर वृत्तसेवा) :- रेल्वेत नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून आणखी एका ‘बंटी-बबली’ने 12 उच्चशिक्षित तरुणांची 68 लाख 30 हजारांची फसवणूक केली. याप्रकरणी वाठोडा पोलिसांनी नागपुरातील एका दाम्पत्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

आशिष प्रदीप गोस्वामी आणि कविता आशिष गोस्वामी (रा. मिलिंदनगर, वाठोडा) अशी आरोपी दाम्पत्याची नावे आहेत. 11 मार्च 2019 ते 22 नोव्हेंबर 2022 दरम्यान ही फसवणूक करण्यात आली. पंचशीलनगर, कन्हान येथे राहणारा शेखर दशरथ बोरकर हा खासगी काम करतो. तो मित्राच्या जावयाच्या घरी गेला असता येथे त्याची आशिषसोबत ओळख झाली. आशिष याने अनेकांना रेल्वेत नोकरी लावून दिल्याचे मित्राच्या जावयाने शेखरला सांगितले. यावरून शेखरने नोकरीसाठी 10 लाख रुपये आशिषला दिले.

शेखर आणि इतर बेरोजगारांना आशिषने एका अधिकार्‍याला भेटायचे असल्याचे सांगत काही दिवसांपूर्वी मुंबईला नेले. सर्वांना लॉजमध्ये थांबवून आशिष तेथून पसार झाला. आपली फसगत झाल्याचे शेखरच्या लक्षात आले. आशिष आणि कविता यांनी 11 बेरोजगारांची 58 लाख 30 हजारांनी फसवणूक केली. याप्रकरणी शेखरच्या तक्रारीवरून वाठोडा पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!