नाशिक :- पत्ता विचारण्याचा बहाणा करून दोन ठिकाणी वृद्ध महिलांच्या गळ्यातून सोनसाखळी ओरबाडून नेल्याच्या घटना जेलरोड व पंचवटी परिसरात घडल्या. या दोन्ही घटना भरदिवसा घडल्याने महिलांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

पहिली घटना पंचवटीतील अमृतधाम जवळ घडली. सुमती रामकिसन ठाकरे (वय 65, रा. अमृतधाम, पंचवटी) या घराजवळ असलेल्या दुकानातून सामान घेऊन घरी जात असताना एका मोटारसायकलीवरून 2 अनोळखी इसम पत्ता विचारण्याच्या बहाण्याने त्यांच्या जवळ आले. त्यांना बोलण्याच्या नादात गुंतवून मोटारसायकलवर मागे बसलेल्या इसमाने ठाकरे यांच्या गळ्यातील मंगळसूत्र ओढून 60 हजार रुपये किमतीचा पोतीचा अर्धा भाग चोरून नेला. याप्रकरणी ठाकरे यांच्या फिर्यादीवरून 2 अनोळखी इसमांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुसरी घटना जेलरोड परिसरातील लोखंडे मळ्यात घडली. रजनी वसंत उदावंत (वय 76, रा. लोखंडे मळा) या काल सकाळी आपल्या मुलाच्या घरी पायी जात होत्या. एका मोटारसायकलीवरून 2 अनोळखी इसम पत्ता विचारण्याच्या बहाण्याने त्यांच्या जवळ आले. त्यांचे लक्ष्य विचलित करून दोघा चोरट्यांनी उदावंत यांच्या गळ्यातील 70 हजार रुपये किमतीची सोन्याची चेन ओरबाडून पळून गेले. या प्रकरणी उदवंत यांच्या तक्रारीवरून उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.