नाशिक (प्रतिनिधी) :- पती-पत्नी बाहेरगावी गेल्याची संधी साधून अज्ञात चोरट्याने घरफोडी करून सोन्याचांदीचे दागिने असा सुमारे दोन लाखांचा ऐवज चोरून नेल्याची घटना वडाळा रोडवरील चिस्तिया कॉलनीत घडली.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी तन्वीर अहमद तन्वीर हकिम खान (रा. महाराष्ट्र हेरिटेज अपार्टमेंट, चिस्तिया कॉलनी, वडाळा रोड, नाशिक, मूळ रा. साकळी, जि. जळगाव) हे पत्नीसह दि. 12 ते 13 मार्चदरम्यान धुळे येथे नातेवाईकांकडे गेले होते. ही संधी साधून अज्ञात चोरट्याने त्यांच्या घराचे कुलूप कशाच्या तरी सहाय्याने तोडून घरात प्रवेश केला. घरातील बेडरूममध्ये असलेली दोन कपाटे कशाच्या तरी सहाय्याने उचकटून त्यात असलेली 12 हजार रुपयांची रोकड, 38 हजार रुपये किमतीचा सोन्याचा नेकलेस, 21 हजार रुपये किमतीची सोन्याची रिंग, 12 हजार रुपये किमतीची सोन्याची रिंग, 6 हजार रुपये किमतीची कानातील रिंग, 11 हजार रुपये किमतीचे वाळे, 38 हजार रुपये किमतीचे दोन वाळे, 6 हजार रुपये किमतीचे दोन वाळे, 20 हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र, 25 हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र व मोती, पाच हजार रुपये किमतीचे चांदीचे ब्रेसलेट, 1500 रुपये किमतीचा चांदीचा कॉईन असा एकूण 1 लाख 95 हजार 550 रुपये किमतीचा ऐवज घरफोडी करून चोरून नेला. खान हे धुळ्याहून घरी परतल्यावर घरफोडी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.

या प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक श्रीवंत करीत आहेत.