नाशिकरोड (प्रतिनिधी):- सातपूर भागात खाजगी सावकारांच्या जाचाला कंटाळून बाप लेकांनी आत्महत्या केल्याची घटना ताजी असतानाच एका सावकाराकडे पैसे वसुलीचे काम करणाऱ्या दोघा सख्ख्या भावांनी विष प्राशन करून आत्महत्या केल्याचा प्रकार नाशिकरोड भागातील एकलहरा रोड वर रविवारी दुपारी घडला.

त्यापैकी एकाचा उपचार दरम्यान मृत्यू झाला तर दुसरा रुग्णालयात उपचार घेत आहे. नातेाइकांनी रुग्णालय बाहेर तोबा गर्दी करीत संशयिताला ताब्यात घेण्याची मागणी पोलिसांकडे केल्याने वातावरण तणावग्रस्त झाले होते,मात्र हा घातपात असल्याचं संशय उपस्थितांनी केला आहे.
याबाबतचे वृत्त असे की रवींद्र लक्ष्मण कांबळे (वय 35 रा. एकलहरे रोड), जगन्नाथ लक्ष्मण कांबळे (वय 39, रा. भालेराव मळा, रा. जयभवानी रोड) हे दोघे सख्खे भाउ एका खाजगी सावकाराकडे पैसे वसुली साठी कामाला होते. दरम्यान काहीतरी कारणावरून सावकार आणि या दोघांमध्ये वाद झाले होते. रविवारी असाच प्रकारे काहीतरी वाद झाल्याने दोघा भावांनी एकलहरे मार्गावरील डोंगराजवळ विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.
दोघे भाऊ एका ठिकाणी रस्त्यावर पडलेल्या अवस्थेत काही नागरिकांना दिसून आल्याने त्यांनी त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. उपचार सुरू असतानाच रात्री रवींद्र कांबळे याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले तर जगन्नाथ याची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
दरम्यान या घटने प्रकरणी पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. जो पर्यंत सावकाराला अटक करीत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी मागणी करीत नातेवाईकांनी रस्ता रोको करण्याचा प्रयत्न केल्याने वातावरण तणावग्रस्त झाले होते.