नाशिक (प्रतिनिधी) :- गोदावरीला महापूर सुरू होऊन गाडगे महाराज पुलाजवळ गौरी पटांगणात दोघे जण पुरात अडकले आहेत. असे वृत्त सर्वत्र पसरते. हे बातमी पंचवटी पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. सीताराम कोल्हे यांना समजली. पाठोपाठ पोलीस, मनपा, जिल्हाधिकारी, आपत्ती निवारण यंत्रणा अशा सर्वांचीच धावपळ उडाली.

वाहनांचे ताफे आणि कर्मचाऱ्यांची फौज दाखल झाली आणि दोघाची पुराच्या पाण्यातून सुटका करण्यास सुरुवात झाली. यावेळी परिसरातील नागरिकही गंगापूर धरणातून नक्की किती पाणी आले या भीतीने भयभीत झाले होते. अन नंतर चित्र स्पष्ट झाले की, ही रंगीत तालीम होती.
महापुराचा अनुभव नुकताच नाशिककरांनी अनुभवला आहे. त्यामुळे गौरी पटांगणात आज दुपारी झालेल्या या मॉक ड्रिलमुळे परिसरात कुतूहल पसरले होते.
या पुढील काळात पुन्हा महापूर आला तर जीवित आणि वित्तहानी होऊ नये या हेतूने पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे यांच्या आदेशान्वये परिमंडळ एकचे उपायुक्त अमोल तांबे, पंचवटी विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त गंगाधर सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली आज दुपारी 12.10 ते 1.07 या वेळेत ही रंगीत तालीम झाली.
यावेळी कॉल मिळताच सर्व यंत्रणांचे अधिकारी, कर्मचारी तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त गंगाधर सोनवणे, पंचवटी ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. सीताराम कोल्हे, प्रशासन पो नि रणजित नलावडे, मनपा विभागीय अधिकारी राबडीया, अहिरे, कानडे, आपत्ती व्यवस्थापनचे देशपांडे, भालेकर, नागरी संरक्षण विभागाचे बावसकर यांच्यासह पंचवटी पोलीस ठाण्याचे 6 पोलीस अधिकारी, महिला पोलिसांसह 16 पोलीस, मनपाची 8 वाहने व अँम्ब्युलन्स, अग्निशमन दल यासह वाहने आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. अचानक आलेल्या यंत्रणेमुळे नागरिकही काय झाले या उत्सुकता आणि काळजीने परस्पर चौकशी करत होते.