नाशिक मध्ये चोरीचे सत्र सुरुच; बलेनो कारसह तीन दुचाकी, एक सायकल लंपास

नाशिक (प्रतिनिधी) :- शहर परिसरात वाहनचोरी व सायकलचोरीचे प्रकार सुरूच असून, काल एका बलेनो कारसह तीन दुचाकी व एका सायकलीची चोरी झाल्याची नोंद विविध पोलीस ठाण्यांत करण्यात आली आहे.

कार चोरीची घटना टाकळी रोड येथे घडली. फिर्यादी अरुण लक्ष्मण डोंगरे (वय 50, रा. श्रीराम भवन, टाकळी रोड, नाशिक) यांनी एमएच 15 जीएल 9141 या क्रमांकाची पाच लाख रुपये किमतीची मारुती सुझुकी बलेनो कार राहत्या इमारतीसमोर पार्क केली होती. दि. 28 जुलै रोजी एक ते पावणेदोन वाजेच्या सुमारास स्विफ्ट कारमधून आलेल्या तीन अज्ञात इसमांनी उभ्या कारचा दरवाजा कशाच्या तरी सहाय्याने खोलून ही कार फिर्यादीच्या संमतीशिवाय लबाडीच्या इराद्याने चोरून नेली. या प्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात अज्ञात तीन व्यक्‍तींविरुद्ध कार चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मुंढे करीत आहेत.

मोटारसायकल चोरीची घटना सोमेश्‍वर धबधब्याजवळ घडली. फिर्यादी सिद्धार्थ संतोष गायकवाड (वय 18, रा. गंगापूर रोड, मूळ रा. नामपूर, ता. बागलाण, जि. नाशिक) हा युवक दि. 25 जुलै रोजी दुपारी 4 वाजता सोमेश्‍वर धबधबा येथे आला होता. त्यावेळी त्याने जीजे 05 एसयू 8548 या क्रमांकाची 60 हजार रुपये किमतीची सुझुकी कंपनीची अ‍ॅक्सिस मोपेड सुलभ शौचालयाजवळ पार्क केली होती. ही मोटारसायकल अज्ञात चोरट्याने गायकवाड यांची नजर चुकवून चोरून नेली. मोटारसायकल चोरीला गेल्याची बाब लक्षात आल्यानंतर गायकवाड याने गंगापूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध फिर्याद दिली असून, पुढील तपास पोलीस नाईक मोहिते करीत आहेत.

मोटारसायकल चोरीची दुसरी घटना ठक्‍कर बझार येथे घडली. फिर्यादी संतोष गणपत निकम (वय 30, रा. खुटवडनगर, सिडको, नाशिक) यांनी एमएच 15 ईडी 8371 या क्रमांकाची 19 हजार रुपये किमतीची होंडा ड्रीम युगा मोटारसायकल ठक्‍कर बझार बस स्टॅण्ड येथे पार्क केली होती. ही मोटारसायकल अज्ञात चोरट्याने दि. 3 ते 4 डिसेंबर 2021 च्या रात्री कधी तरी चोरून नेली. या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात चोरीची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस नाईक साबळे करीत आहेत.

मोटारसायकल चोरीची तिसरी घटना श्रमिकनगर येथे घडली. फिर्यादी गणेश दादा पाटील-मालुंजकर (वय 36, रा. कडे पठार चौक, श्रमिकनगर, सातपूर, नाशिक) हे दि. 16 जुलै रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास श्री गुरुजी हॉस्पिटल येथून ड्युटी संपवून श्रमिकनगरकडे जात असताना सिएट कंपनीजवळील हॉटेल शिवबा येथील नाल्याजवळ मालुंजकर यांना अज्ञात इसमांनी मारहाण केली. त्यावेळी मालुंजकर यांनी एमएच 15 बीवाय 0754 या क्रमांकाची 15 हजार रुपये किमतीची हिरोहोंडा स्प्लेंडर मोटारसायकल तेथेच सोडून औषधोपचारासाठी दवाखान्यात दाखल होते. फिर्यादी यांना दि. 18 रोजी डिस्चार्ज मिळाल्यानंतर त्यांनी सदर जागेवर जाऊन मोटारसायकलीचा शोध घेतला; मात्र त्यांना मोटारसायकल मिळून आली नाही. या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस हवालदार सूर्यवंशी करीत आहेत.

सायकल चोरीची घटना जय भवानी रोड येथे घडली. फिर्यादी राजकुमार नागेश्‍वर सिंह (वय 38, रा. श्रीहरी वैकुंठ सोसायटी, गुलमोहर कॉलनी, जय भवानी रोड, नाशिकरोड) यांनी मुलाच्या नावावर असलेली 13 हजार 500 रुपये किमतीची कोरॅडो कंपनीची रेंजर टाईप डिस्क सायकल लवटेनगर येथे रामा कोचिंग क्‍लासेसजवळ रस्त्याच्या कडेला पार्क करून ठेवली होती; मात्र ही सायकल अज्ञात चोरट्याने सिंह यांची नजर चुकवून चोरून नेली. या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक माळोदे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!