मनमाड (वार्ताहर) :- छतावरील पाईपास बांधलेली 33 केव्हीची बंद स्थितीत असलेल्या तारा काढण्यासाठी 20 हजार रुपयांची लाच स्विकारताना वीज वितरण कंपनीचे सहाय्यक अभियंता महेंद्र श्रावण चव्हाण, खासगी कंत्राटदार कुणाल दादा ठाकरे, अंकुश मोठाभाऊ डुकळे या तिघांना काल नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबीने) तक्रारदाराच्या दुकानात अटक केली.
प्रसिद्धीपत्रकात दिलेल्या माहितीनुसार यातील तक्रारदार यांनी तक्रार दिली असता त्यांच्या घरावर असलेल्या पाईपाला 33 केव्हीची बंद स्थितीत असलेल्या विद्युत वाहक तारा या वीज वितरणतर्फे अनधिकृतपणे बांधल्या होत्या. या तारा घरावर आल्या असल्याने आणि पावसाळ्याचे दिवस असल्याने कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी या तारा काढण्यात याव्या म्हणून तक्रारदार यांनी वीज वितरण कार्यालयात तक्रार दिली होती. तसा अर्जही केला होता.
मात्र आलेली तक्रार न सोडवता तातडीने तिची कायदेशीर पूर्तता न करता सहाय्यक अभियंता महेंद्र चव्हाण यांनी त्यांच्या मर्जीतील खासगी कंत्राटदार नेमले. खासगी कंत्राटदार कुणाल ठाकरे, अंकुश डुकळे या दोघांकडे काम दिले. या दोघांनी हे काम करण्यासाठी अर्जदार यांच्याकडे 20 हजार रुपयांची मागणी केली होती. त्यामुळे तक्रारदार यांनी नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबीच्या) कार्यालयात तक्रार दिली होती. त्यानुसार काल या तिघांना रंगेहात पकडण्यासाठी सापळा रचण्यात आला होता.
लाच देण्याचे ठिकाण ठरले. त्यानुसार तक्रारदाराच्या दुकानात या तिघांना बोलावण्यात आले. तेथे 20 हजार रुपये पंचांसमक्ष स्वीकारताना वीज वितरण कंपनीचे सहायक अभियंता महेंद्र चव्हाण (वय37), कुणाल ठाकरे (वय30), खासगी कंत्राटदार, रा. शिक्षक कॅालनी, मनमाड), अंकुश डुकळे (वय29, खासगी कंत्राटदार, रा. झाडी, ता. मालेगाव) या तिघांना काल नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबीने) तक्रारदाराच्या दुकानात रंगेहात अटक केली.