नाशिक( प्रतिनिधी)– दिनांक 4 जुन ते 13 जुन हरियाणा येथे 4थ्या खेलो इंडिया स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या महाराष्ट्र राज्याच्या प्रातिनिधिक संघाची निवड पुणे येथे झालेल्या निवड चाचणीतून जाहीर करण्यात आली.
महाराष्ट्राच्या मुलींच्या संघात राष्ट्रीय स्पर्धेतील सर्वोत्तम आक्रमक पुरस्कार प्राप्त नाशिकच्या वृषाली भोये व अष्टपैलू खेळाडू कौसल्या पवार यांचा समावेश करण्यात आला आहे. या दोन्ही खेळाडूंना नुकतीच एअरपोर्ट स्पोर्टस अथॉरिटी ऑफ इंडियाची शिष्यवृत्ती जाहीर झाली आहे. खेलो इंडिया खो खो स्पर्धेत सहभागी होणाऱ्या त्या नाशिकच्या पहिल्या दोन खेळाडू आहेत. त्या नाशिक जिल्हा खो खो असोसिएशन संचलित प्रबोधिनीच्या खेळाडू आहेत.
खेलो इंडिया मुलांच्या खो खो स्पर्धेत विजेत्या महाराष्ट्राचे कर्णधार पद भूषविणाऱ्या व राष्ट्रीय स्पर्धेतील सर्वोत्तम भरत पुरस्कार प्राप्त चंदू चावरे याचा समावेश आहे. सलग तिसरी खेलो इंडिया स्पर्धा खेळणारा तो नाशिकचा एकमेव खेळाडू आहे.
वृषाली, कौसल्या व चंदू हे संस्कृती नाशिक या संस्थेचे खेळाडू आहेत. जिल्हा खो खो असोसिएशन व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय संचलित शिव छत्रपती महाराज क्रीडा संकुल येथील प्रशिक्षण केंद्रात ते सराव करतात. त्यांना उमेश आटवणे व गीतांजली सावळे यांचे मार्गदर्शन लाभले आहे. हे सर्व खेळाडू श्रीराम विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात शिकत आहेत.
प्रथमच नाशिकच्या तीन खेळाडूंची खेलो इंडिया खो खो स्पर्धेसाठी निवड झाली आहे. खो खो असोसिएशनचे अध्यक्ष विश्वास ठाकूर, संस्कृती नाशिकचे अध्यक्ष शाहू महाराज खैरे, अनिल चोरमले, क्रीडा उपसंचालक पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी राजेशकुमार बागुल, रायगडचे जिल्हा क्रीडा अधिकारी रविंद्र नाईक, आजीवन अध्यक्ष रमेश भोसले, कार्याध्यक्ष आनंद गारंमपल्ली यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले व स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.