नाशिक (प्रतिनिधी) :- ध्रुवनगर येथे चार महिन्यांच्या चिमुकलीच्या हत्येचे गुढ गंगापूर पोलिसांनी अवघ्या 24 तासांत उकलले असून, पोलीस तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, ध्रुवांशी भुषण रोकडे हिची 20 तारखेला अज्ञात महिलेने हत्या केल्याची तक्रार तिची आई युक्ता भूषण रोकडे हिने गंगापूर पोलीस ठाण्यात काल दिली होती.
गंगापूर-सातपूर लिंकरोड येथील ध्रुवनगर परिसरात भुषण रोकडे हे आपली पत्नी, आई आणि 4 महिन्यांची चिमुकली ध्रुवांशी यांच्यासमवेत राहतात. भूषण हे सातपूर येथील एका कंपनीत सुपरवायझर आहेत. काल ते नेहमीप्रमाणे कामाला गेल्यानंतर घरात त्यांची मुलगी आणि पत्नी या दोघीच होत्या. 20 मार्च रोजी संध्याकाळी 7 वाजेच्या सुमारास एक अज्ञात बाई घरात घुसली, तिने युक्ताला फूस लावून बेशुद्ध केले आणि तिने बालिकेची हत्या केल्याची माहिती पोलिसांना माहिती दिली होती.
या घटनेचा तपास करत असताना पोलिसांचा संशय युक्ता रोकडेवर बळावला होता. त्या दिशेने तपास सुरू केल्यानंतर धक्कादायक बाब समोर आली.
सर्व प्रकरणाबाबत माहिती देताना परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण यांनी सांगितले की, ध्रुवनगरमध्ये झालेल्या या घटनेचा तपास पूर्ण झाला आहे. पोलिसांनी युक्ता भूषण रोकडे या महिलेला म्हणजेच आईला विश्वासात घेऊन काल संध्याकाळी तपास सुरू केल्यानंतर युक्ताने घडलेला सर्व प्रकार हा पोलिसांसमोर कथन केला. तिने दिलेल्या माहितीनुसार ध्रुवांशी ही नेहमीच तिचे वडील भूषण आणि त्यांची आई यांच्याकडे सातत्याने जात असे आणि त्यांच्याकडे ती आनंदात राहत असे.
या परिसरामध्ये राहणारे नागरिक, नातेवाईक हे नेहमीच युक्ताला मुलगी वडिलांवर गेली आहे, ती वडिलांसारखीच दिसते, ती वडिलांकडे आनंदाने राहते असे सातत्याने बोलत युक्ताला हिणवत होते. यामुळे युक्ता नैराश्याच्या गर्तेत आली होती आणि सातत्याने तोच विचार सुरू असल्यामुळे तिने ध्रुवांशी ची हत्या केली.
युक्ताने माहिती देताना पोलिसांना सांगितले की, यापूर्वी तिचा दोन वेळा गर्भपात झाला आहे. परिसरातील नागरिकांच्या अशा वागण्यामुळे तिने हे कृत्य केल्याचे कबूल केले. घरातीलच चाकूने तिने धृवांशीचा गळा कापला आणि पुन्हा तो चाकू धुऊन घरामध्ये ठेवून दिला. समोर झालेल्या घटनेमुळे तिला थोडी भुरळ आली आणि ती काही काळ बेशुद्ध पडली होती असे समोर येत आहे. या प्रकरणी युक्ताला पोलिसांनी अटक केली असून तिची मेडिकल करण्यात आली आहे. मानसशास्त्र तज्ञांकडे देखील तिची तपासणी करण्यात येणार आहे.
पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली गंगापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रियाज शेख व त्यांच्या सहकार्यांनी या हत्येचे गुढ अवघ्या 24 तासांत उकलले आहे.