नांदेड : नांदेडमधील भीषण अपघातात तिघांचा जागीच तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. शंकर जाधव, महानंदा जाधव, कल्पना शिंदे, धनराज जाधव अशी अपघातामधील मृतांची नावे आहेत.

काल रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. कार आणि ट्रकच्या धडकेत झालेल्या या भीषण अपघातामध्ये एक गरोदर महिला बालंबाल बचावली असून ती सध्या जखमी आहे. तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. नांदेड–देगलूर मार्गावरील शंकरनगरजवळ ट्रकने स्विफ्ट कारला समोरासमोर धडक दिली.
नरसी कडून देगलूरकडे जाणाऱ्या MH 25 T 1075 या क्रमांकाच्या स्विफ्ट कारला समोरून येणाऱ्या AP 03 TA 3186 या क्रमांकाच्या ट्रकने जोरदार धडक दिली. या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. मात्र पोलीस घटनास्थळी पोहोचण्याआधीच तिघांचा मृत्यू झाला होता. तर कार चालक गंभीर जखमी अवस्थेत होता. कार चालकाला उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान कारचालक धनराज शंकर जाधव याचाही मृत्यू झाला.