नाशिक शहरातून तब्बल सहा मुलींचे अपहरण

नाशिक (प्रतिनिधी) :- शहर परिसरातून वेगवेगळ्या ठिकाणांहून सहा मुलींचे फूस लावून अज्ञात व्यक्‍तींनी अपहरण केल्याप्रकरणी विविध पोलीस ठाण्यांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अपहरणाचा पहिला प्रकार शालिमार येथे घडला. याबाबत अपहृत मुलीच्या आईने फिर्याद दिली आहे. त्यात म्हटले आहे, की त्यांची मुलगी दि. 20 जून रोजी सकाळी साडेआठ वाजता शालिमार परिसरात गेली होती. त्यावेळी श्‍वेता बँगल्स दुकानासमोर उभी असताना अज्ञात इसमाने या मुलीला फूस लावून फिर्यादी महिलेच्या कायदेशीर रखवालीतून पळवून नेले. बराच वेळ होऊनही मुलगी घरी न परतल्याने अखेर अपहृत मुलीच्या आईने भद्रकाली पोलीस ठाण्यात मुलीच्या अपहरणाची तक्रार दिली आहे.

अपहरणाचा दुसरा प्रकार भद्रकाली परिसरात घडला. फिर्यादी महिलेची मुलगी ही दि. 20 जून रोजी सकाळी 11 वाजता जीपीओ पाठीमागील पंचशीलनगर येथे घराजवळ असताना अज्ञात इसमाने या मुलीला फूस लावून आईच्या कायदेशीर रखवालीतून पळवून नेले. ही बाब लक्षात आल्यानंतर अपहृत मुलीच्या आईने भद्रकाली पोलीस ठाण्यात मुलीच्या अपहरणाची फिर्याद दिली आहे.

अपहरणाचा तिसरा प्रकार राणाप्रताप चौकाजवळ घडला. फिर्यादी महिलेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, की फिर्यादी यांची 15 वर्षीय मुलगी क्‍लासला जाते, असे सांगून असे सांगून राणाप्रताप चौकातील हनुमान चौकाजवळील काल दुपारी दोन वाजता घरातून गेली; मात्र बराच वेळ होऊनही ती घरी परतली नाही. तिचे कोणी तरी अज्ञात व्यक्‍तीने फूस लावून अपहरण केल्याचा संशय आल्याने अपहृत मुलीच्या आईने अंबड पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्‍तीविरुद्ध अपहरणाची फिर्याद दिली आहे.

अपहरणाचा चौथा प्रकार अंबड हद्दीतच घडला. फिर्यादी यांची मुलगी 20 जून रोजी सकाळी साडेसात वाजता अंबड येथील स्वामीनगरातील घरी होती. त्यावेळी अज्ञात व्यक्‍तीने या मुलीला कशाचे तरी आमिष दाखवून फूस लावून फिर्यादी महिलेच्या कायदेशीर रखवालीतून पळवून तिचे अपहरण केले. ही बाब लक्षात आल्यानंतर अपहृत मुलीच्या आईने अंबड पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाविरुद्ध अपहरणाची फिर्याद दिली आहे.

अपहरणाचा पाचवा प्रकार लेखानगर येथे घडला. याबाबत अपहृत मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, की त्यांच्या मुलीला फिर्यादीने राहत्या घराजवळून कॉलेजला जाण्यासाठी रिक्षात बसवून दिले होते; मात्र कॉलेजची वेळ संपल्यानंतरही ही मुलगी घरी आली नाही. म्हणून फिर्यादी महिलेने कॉलेज व आजूबाजूच्या परिसरात शोध घेतला; पण ती मिळून आली नाही. त्यामुळे त्यांची खात्री झाली, की आपल्या मुलीला कोणी तरी अज्ञात व्यक्‍तीने अज्ञात कारणातून फूस लावून आमिष दाखवून पळवून नेले. या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अपहरणाचा सहावा प्रकार भगूूर येथे घडला. फिर्यादी यांची मुलगी दि. 20 जून रोजी सकाळी साडेदहा वाजता भगूर येथील नूतन माध्यमिक विद्यामंदिर या शाळेत गेली होती. त्यावेळी या मुलीला अज्ञात इसमाने तिच्या अज्ञानपणाचा फायदा घेऊन फूस लावून पळवून नेले आहे. तिचा सर्वत्र शोध घेतला; मात्र ती मिळून आली नाही. याबाबत देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्‍तीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!