नाशिकरोड प्रतिनिधी: नाशिकरोड पोलिसातील गुन्हे शोध पथकाने चोरी गेलेली तवेरा गाडी व बांधकाम साईट वर लागणारे लोखंड,रिक्षासह ताब्यात घेऊन सुमारे सहा लाख रुपये चा ऐवज हस्तगत करून दोन संशयिताना जेरबंद केले आहे.
नाशिकरोड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक देविदास वांजळे यांनी पोलीस ठाण्याचा कार्यभार घेऊन अवघे काही तास उलटत असतांना दोन मोठया चोरीची उकल केली आहे.
या बाबत पोलिस उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांनी सांगितले की,दि १३मार्च रोजी शिंदेगाव येथून बाळकृष्ण शंकर सोनवणे यांची तवेरा गाडी ही अज्ञात चोरट्यानी चोरून नेली होती. नाशिकरोड पोलिसात या बाबत गुन्हा दाखल होता. गुन्हे शोध पथकाने सदर गाडी शोधण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज आधार घेऊन माहिती काढीत वसीम जिल्ह्यातील तालुका कारंजा लाड, काजळेश्वर येथून संशयित फैजानउद्दीन उर्फ राज फैजानउद्दीन (वय27) यास शिताफीने ताब्यात घेऊन सुमारे पाच लाख रुपयांची तवेरा गाडी हस्तगत केली. सदर गुन्ह्याचा तपास पोलिस उपनिरीक्षक जयेश गांगुर्डे करीत आहे.
दुसऱ्या घटनेत दि २५मार्च रोजी सामनगाव येथील आनंदम सिटी ही बिल्डिंग तयार होत असलेल्या बांधकाम साईट वरून४५हजार रुपये किंमतीचे४५लोखंडी प्लेटा,२१लोखंडी चिमटा(सिंकजा)चोरी झाल्या बाबत मयूर दिलीप बागुल यांनी फिर्याद दिली होती. गुन्हे शोध पथकाला मिळालेल्या गोपनीय माहिती नुसार सदर साहित्य हे रिक्षातून चोरी झाले आहे. रिक्षा चा शोध घेतला असता गोरेवाडी भागातील असल्याचे समजले.
पोलिसांनी गोरेवाडी,शस्त्री नगर येथील विक्रांत सुनील हंडोरे (वय२२)यास ताब्यात घेऊन त्याच्या कडून गुन्ह्यात वापरलेली रिक्षा सह बांधकाम साईट वरील लोखंडी साहित्य असा एक लाख रुपयांचा ऐवज हस्तगत केला आहे. गुन्ह्याचा तपास पोलिस हवालदार विलास गांगुर्डे करीत आहे. असा दोन्ही गुन्ह्यातील सुमारे सहा लाखाचा ऐवज व दोन संशयित पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
ही कामगिरी पोलिस आयुक्त अंकुश शिंदे, उपायुक्त चंद्रकांत खांडवी, सहाय्यक पोलीस आयुक्त अंबादास भुसारे यांच्या मार्गदर्शनाखाली वपोनी देविदास वांजळे, पोलीस निरीक्षक पवन चौधरी, राजू पाचोरकर, गुन्हे शोध पथकातील पोलीस हवालदार अनिल शिंदे, वसंत काकड, अविनाश देवरे, विष्णु गोसावी, विजय टेमगर, सचिन गावले, मनोहर शिंदे, राकेश बोडके, केतन कोकाटे,महिंद्र जाधव, विशाल कुंवर, समाधान वाजे, अजय देशमुख,सागर आडणे,सोमनाथ जाधव, सागर पांढरे, योगेश रानडे यांनी सहभाग घेऊनपार पाडली.