Leopard attacks girl : बिबट्याच्या हल्ल्यात 8 वर्षीय बालिका ठार

नाशिक (प्रतिनिधी) :- घराजवळ खेळत असलेल्या बालिकेला बिबट्याने जबड्यात धरून जंगलात फरफटत नेले. रात्री उशिरा झुडपात बालिकेचा मृतदेह छिन्नाविच्छिन्न अवस्थेत आढळून आला. या घटनेमुळे त्र्यंबकेश्‍वर तालुक्यातील धुमोडीच्या गावकर्‍यांमध्ये घबराट पसरली आहे.

वनविभागाच्या नाशिक वनपरिक्षेत्र कार्यालयाकडून मिळालेली अधिक माहिती अशी, त्र्यंबकेश्वर तालुक्यातील धुमोडी गावाच्या शिवारात असलेल्या वाघ कुटुंबियांच्या घराच्या अंगणातून रुची एकनाथ वाघ (वय 8) हिच्यावर बिबट्याने हल्ला करून तिला जबड्यात धरून वेगात काल संध्याकाळी सात वाजता जंगलात पळून गेला. बिबट्याने मुलीला उचलून नेल्याचे समजताच गावकर्‍यांनी त्याच्या पाठीमागे धाव घेतली. घटनेची माहिती वनविभागाला कळविण्यात आली. माहिती मिळताच वन परिक्षेत्र अधिकारी विवेक भदाणे हे पथकासह घटनास्थळी रवाना झाले. अंजनेरी, मुळेगावसह नाशिकच्या वन कर्मचार्‍यांच्या अतिरिक्त पथकाला घटनास्थळी त्यांनी पाचारण केले. वनरक्षक, वन मजुरांसह गावकर्‍यांनी सुमारे तीन तास शोध घेतला.

हातात बॅटरी घेऊन सर्वत्र बलिकेचा शोध घेतला जात होता मात्र अंधार असल्याने बालिका आढळून आली नाही. अखेर रात्री दहा वाजेच्या सुमारास बालिकेचे शव गावापासून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या झुडपामध्ये दिसून आले. वन कर्मचार्‍यांनी मृतदेह ताब्यात घेत पंचनामा करून शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविला. या घटनेने संपूर्ण धुमोडी पंचक्रोशीत दहशत पसरली असून मुक्त संचार करणार्‍या बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!