नाशिक :- महानगरपालिकेतर्फे मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या आदेशाने सहा विभागात प्लास्टीक बंदीची काटेकोर अंमलबजावणी केली जात आहे.
वेळोवेळी जप्ती मोहिमा राबवल्या जात आहेत. पंचवटी विभागात घनकचरा व्यवस्थापन विभागाचे संचालक डॉ. आवेश पलोड यांच्या मार्गदर्शनाखाली विभागीय अधिकारी नरेंद्र शिंदे व विभागीय स्वच्छता निरीक्षक संजय दराडे यांनी प्रतिबंधित प्लास्टिक जप्ती मोहिम राबवली.
चार व्यापा-यांविरोधात गुन्हा दाखल करुन 20 हजारांचा दंड वसुल करण्यात आला आहे. पहिला दंड असल्यानं प्रत्येक व्यापा-याला पाच हजारांचा दंड आकारण्यात आला आहे. पंचवटी विभागातील पेठ नाका, दिंडोरी नाका, कृषी उत्पन्न बाजार समिती, आरटीओ परिसरात पथकामार्फत पाहणी करण्यात आली.
व्यावसाहिक आणि ग्राहकांनी प्रतिबंधित प्लास्टिक पिशव्यांचा वापर न करता कापडी पिशव्यांचा वापर करावा, दूध अथवा दुग्धजन्य पदार्थ खरेदीसाठी प्लास्टिक पिशव्यांचा वापर करू नये हे आरोग्य व पर्यावरणास घातक आहे, अशी जनजागृतीही पथकामार्फेत करण्यात आली.
‘गुडबाय सिंगल युज प्लास्टिक, आता आपल्यामुळेच फरक पडेल’, असं नागरिकांना आणि व्यापा-यांना मनपातर्फे आवाहन करण्यात आले आहे. या मोहिमेत स्वच्छता निरीक्षक किरण मारू, दीपक चव्हाण, दुर्गादास मालेकर, उदय वसावे आणि कर्मचारी नरेश नागपुरे, पुष्कर बारे, संजय जाधव यांनी सहभाग घेतला होता.