नाशिक प्रतिनिधी: पार्किंगमधील दुचाकीच्या हॅण्डलला अडकवलेली पावणेतीन लाखांची रोकड असलेली सॅक अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना बोधलेनगर येथे घडली.
फिर्यादी अशोक तोताराम पाटील (वय 63, रा. उपनगर, नाशिक) हे बोधलेनगर येथील स्टेट बँकेच्या शाखेत आले होते. त्यावेळी त्यांनी बँकेसमोरील पार्किंगमध्ये ज्युपिटर गाडी पार्क केली होती. या गाडीच्या हॅण्डलला अडकवलेली 2 लाख 75 हजार रुपयांची रोकड असलेली सॅक एका अनोळखी सडपातळ, चष्मा लावलेल्या इसमाने लबाडीच्या इराद्याने चोरून नेली.
या प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक शिंदे करीत आहेत.