बीड : येथे धक्कादायक घटना घडली आहे. तालमीतील मल्लाने पराभूत केल्याच्या रागामधून एका पैलवानाला बेदम मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी 20 जणांविरोधात आष्टी पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. या घटनेत आरोपींमध्ये महाराष्ट्र केसरी विजेता मल्ल सईद चाऊसचा मुख्य आरोपी म्हणून समावेश आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मनोज रामदास पवार असे मारहाण झालेल्या मल्लाचे नाव आहे. मनोज पवार हा महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा विजेता मल्ल सईद चाऊस याच्या तालमीमध्ये काही दिवस जात होता. परंतु काही दिवसांपूर्वी त्याने तालीम सोडली होती. दरम्यान काही कुस्ती स्पर्धांमध्ये त्याने सईदच्या तालमीमध्ये प्रशिक्षण घेणाऱ्या मल्लांचा पराभव केला होता. याचा राग मनामध्ये धरून सईद चाऊस आणि त्याच्या तालमीमधील इतर मल्लांनी मनोज पवार यांची दुचाकी अडवली.

‘तू पूर्वी आमच्या तालमीत येत होतास, आता का येत नाही, आमच्या पैलवानांना का पाडतोय’ असे म्हणून त्याला बेदम मारहाण केली. एवढच नाहीतर या टोळक्याने त्याच्यावर चाकूने देखील हल्ला करुन खिशातील 10 हजार रुपये काढून घेतले. या घटनेनंतर मनोज पवार याने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.