नाशिक (प्रतिनिधी) : पूर्ववैमनस्यातून शेतात अनधिकृतपणे प्रवेश करून गव्हाचे पीक जाळणार्या ११ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी संदीप पोपट रोकडे (वय ३६, रा. नानेगाव, ता. जि. नाशिक) यांच्या मालकीची नानेगाव येथे सर्व्हे नंबर ४२७ (१) येथे शेतजमीन आहे. या शेतीत आरोपी फशाबाई अशोक रोकडे (वय ५१), अशोक बाबूराव रोकडे (वय ५४), संजय नाना रोकडे (वय ४५), सोमनाथ नाना रोकडे (वय ३८), सुनील केरू रोकडे (वय ४६), योगेश अशोक रोकडे (वय ३२), भानुदास अशोक रोकडे (वय ३६), नामदेव अशोक रोकडे (वय ३४), योगीता सोमनाथ रोकडे (वय ३५), सविता भानुदास रोकडे (वय ३२, सर्व रा. नानेगाव, ता. जि. नाशिक) व शरद फकिरा कासार (वय ४०, रा. शेवगेदारणा, ता. जि. नाशिक) यांनी अनधिकृतपणे शेतात प्रवेश करून तेथे असलेले गव्हाचे पीक कशाच्या तरी सहाय्याने जाळून खाक केले.

हा प्रकार दि. १ जून २०२२ रोजी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास घडला होता. फिर्यादी यांनी याबाबत न्यायालयात तक्रार अर्ज दाखल केला होता. त्यानुसार न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात ११ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गिते करीत आहेत.