नाशिक (प्रतिनिधी) :- दिवाळीत घरी एकटी असल्याची संधी साधत चुलत मामाने भाचीवर केलेल्या अत्याचार प्रकरणी न्यायालयाने नराधम मामास जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, नोव्हेंबर 2018 मध्ये दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये पीडित अल्पवयीन मुलगी एकटी होती. त्यावेळी तिच्या अज्ञानाचा फायदा घेऊन सचिन मुरलीधर सोनवणे (वय 32, रा. वाघाडी, पंचवटी, नाशिक) याने घरातील किचन मध्ये जबरदस्तीने तिच्याशी शरीर संबंध केला. सचिन हा नात्याने पीडित मुलीचा चुलत मामा आहे.
झाल्या प्रकाराबद्दल कोणास सांगितले तर, तुझ्या काकाच्या मुलीस असेच करेल अशी तिला धमकी दिली. त्यानंतरही पीडित मुलगी घरात एकटी असतांना तिला पुन्हा तीच धमकी देऊन तिच्याशी जबरदस्तीने शरीरिक संबंध ठेवले. त्यामुळे ती गर्भवती होऊन तिने अल्पवयातच दि. 26/9/2019 रोजी जिल्हा रुग्णालयात एका मुलीला जन्म दिला. याबाबत आरोपी विरुद्ध भद्रकाली पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्याचा तपास महिला पोलीस उपनिरीक्षक जयश्री अनवणे यांनी अतिशय चिकाटीने केला. आरोपी विरुद्ध जिल्हा न्यायालयात दाखल केलेल्या खटल्याची विशेष पोक्सो न्यायालयात सुनावणी झाली.
न्यायमूर्ती डी. डी. देशमुख यांनी आरोपीस जन्मठेप, 2 वर्ष सश्रम कारावास, 12 हजार रुपये दंड, दंड न भरल्यास 7 महिने कारावासाची शिक्षा सुनावली. या खटल्यात सरकार तर्फे सहाय्यक सरकारी अभियोक्ता श्रीमती दिपशिखा भिडे यांनी कामकाज पाहिले. पैरवी अधिकारी म्हणून अंमलदार व्ही. एम. सोनवणे, एस. सी. शिंदे यांनी पाठपुरावा केला.