मुंबई : एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्यासाठी कोणतेही पत्र अथवा निमंत्रण देण्यात आले नव्हते, असा धक्कादायक खुलासा राजभवनाकडून करण्यात आला आहे. माहितीच्या अधिकारातून ही माहिती समोर आली आहे. यावरून आता विरोधक सरकारची कोंडी करण्याची शक्यता आहे.
एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बंड केले. शिवसेनेतील अनेक आमदारांचा त्यांना पाठिंबा मिळाला त्यामुळे ठाकरे सरकार अल्पमतात आले आणि उद्धव ठाकरे यांना राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी भाजपाच्या पाठिंब्याने मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर ठाकरे गटाने या सरकारच्या वैधतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करत सर्वोच्च न्यायलयात धाव घेतली होती. सध्या हे प्रकरण घटनापीठाकडे वर्ग करण्यात आले आहे. या प्रकरणावर घटनापीठात सुनावणी सुरू असतानाच मोठी बातमी समोर आली आहे. शिंदे, फडणवीस यांना महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्यासाठी कोणतेही पत्र अथवा निमंत्रण देण्यात आले नव्हते, असा धक्कादायक खुलासा राजभवनाकडून करण्यात आला आहे.

माहिती अधिकारातून ही माहिती समोर आली आहे. दरम्यान यावरून राष्ट्रवादी काँग्रेसने शिंदे, फडणवीस सरकार आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर निशाणा साधला आहे. राज्यपालांनी शिंदे आणि फडणवीस यांना पदाची शपथ कशी दिली? ही शपथच असैविधानिक असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी केला आहे. माहिती अधिकारात झालेल्या या नव्या खुलाशामुळे आता नवे प्रश्न निर्माण झाले असून, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी घटनात्मक भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणीही महेश तपासे यांनी केली आहे.