मुंबई (भ्रमर वृत्तसेवा) :- महाराष्ट्रातील सत्ताबदलाच्या नाट्यात विविध घडामोडी होत असतानाच शिवसेना नेते आणि कॅबिनेट मंत्री ना. आदित्य ठाकरे यांच्या प्रोफाईलवरील मंत्रिपदाचा उल्लेख काढण्यात आल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे विश्वासदर्शक ठरावापूर्वीच आदित्य ठाकरे हे मंत्रिपदाचा राजीनामा देणार किंवा कसे याबाबत चर्चा सुरू झाली आहे.

बंडखोर नेते एकनाथ शिंदे हे 33 आमदारांसह गुवाहाटी येथे पोहोचले होते. त्यापैकी निवडक आमदारांना घेऊन तेथून गोव्यात येऊन गोव्याचे राज्यपाल पी. श्रीधरन यांना सत्तास्थापनेबाबत निवेदन देऊन चर्चा करतील, अशी शक्यता आहे. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने अद्याप महाविकास आघाडी शासनाचा पाठिंबा काढलेला नाही. राजकीय घडामोडी हा शिवसेना पक्षांतर्गत प्रश्न आहे, अशी त्यांची भूमिका आहे.
सत्ता सोडायची अथवा नाही, याबाबत कोणतीही पूर्वतयारी झालेली नसताना आदित्य ठाकरे यांनी त्यांच्या प्रोफाईलवरील मंत्रिपदाचा उल्लेख काढल्यामुळे पेचप्रसंग सुटण्यापूर्वीच आदित्य ठाकरे मंत्रिपद सोडणार का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.