दिल्ली महानगरपालिकेत अखेर ‘आप’ ने मारली बाजी; भाजपची दीड दशकाची सत्ता संपुष्टात

नवी दिल्ली : संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या दिल्ली महानगरपालिकेत अखेर ‘आप’ ने बाजी मारली आहे. ४ डिसेंबर रोजी पार पडलेल्या मतदानानंतर आज मतमोजणी झाली. दिल्ली महापालिका निवडणुकीत आम आदमी पक्षाला बहुमत मिळाले आहे. यासोबतच दिल्ली महापालिकेवरील भाजपची दीड दशकाची सत्ता संपुष्टात आली आहे. या निवडणुकीमध्ये मुख्य लढत आप, भाजप आणि काँग्रेसमध्येच होती. भाजपने कडवी लढत दिली आहे. तर काँग्रेसला दुहेरी आकडा गाठण्यासाठी प्रचंड मेहनत करावी लागत आहे.

दिल्ली महापालिकेच्या 250 जागांसाठी 4 डिसेंबर रोजी मतदान झाले होते. तर आज मतमोजणी झाली. या निवडणुकीमध्ये 250 जागांसाठी एकूण 1349 उमेदवार मैदानात होते. दिल्ली महापालिकेवर गेल्या 15 वर्षांपासून भाजपची सत्ता होती. परंतु यंदा आम आदमी पक्षाला दिल्ली महापालिकेची सत्ता काबीज करण्यात यश आले आहे. दरम्यान, दिल्ली महापालिकेच्या 250 पैकी 233 जागांचे निकाल (दुपारी 2 वाजेपर्यंत) हाती आले आहेत. यामध्ये आम आदमी पक्षाला 126 जागांवर विजय मिळाला आहे. तर भाजप 97 जागांवर विजयी झाली आहे. काँग्रेसने 7 जागांवर विजय संपादन केला आहे. तर 3 अपक्ष उमेदवाराचा विजय झाला आहे. अजूनही 17 जागांचे निकाल येणे बाकी आहे.

कलांमध्ये बहुमत मिळाल्यानंतर आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष करण्यास सुरुवात केली आहे. दिल्लीमध्ये आपच्या कार्यालयाबाहेर जल्लोष सुरु आहे. तर मुंबईत देखील आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!