नाशिक प्रतिनिधी: कुठे तक्रार केलीस तर तुझ्या घरच्यांना मारून टाकेन अशी धमकी देऊन वारंवार पिडीत मुलीवर अत्याचार करणार्या प्रवीण प्रकाश किरवे (रा.वीरसावरकर नगर, जेलरोड) या आरोपीस कोर्टाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत जुलै 2010मध्ये आरोपी किरवे यांनी एका मुलीवर घरच्यांना मारून टाकेन, असा धाक दाखवून वारंवार अत्याचार केला होता. या प्रकरणी उपनगर पोलिसांनी भादंवि 376 व बालकांचे लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा 2012 च्या कलमान्वये गुन्हा नोंदवून या घटनेचा तपास तत्कालीन महिला पोलीस उपनिरीक्षक संध्या तेली यांनी केला आणि खटला कोर्टात पाठविला.
जिल्हा व सत्र न्यायालय क्रमांक 12 च्या न्यायमूर्ती श्रीमती व्ही.एस. मलकापट्टे-रेड्डी यांच्या कोर्टात कामकाज चालवून न्या. मलकापट्टे यांनी बालकांचे लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा सन 2012 च्या कलम सहा अन्वये जन्मठेपेची शिक्षा सुनावली तसेच 10 हजार रुपये दंड व दंड न भरल्यास तीन महिने साध्या कारवासाची शिक्षा सुनावली.
या खटल्यात सहाय्यक सरकारी अभियोक्ता अॅड. दीपशिखा भिडे यांनी कामकाज पाहिले.