मुंबई : मंगेश देसाई यांचे नाव धर्मवीर सिनेमापासून कायम चर्चेत राहिले आहे. ठाणे शहराचे दैवत अशी ओळख असणाऱ्या आनंद दिघे यांच्या आयुष्यावर आधारित ‘धर्मवीर’ सिनेमा बनवल्याने त्यांचे नाव सध्या कौतुकाने घेतले जात आहे.

धर्मवीर चित्रपटाचे निर्माते मंगेश देसाई यांच्या कारचा अपघात झाला आहे. मंगेश देसाई आपल्या कुटुंबियांसोबत कर्जतला जात असताना सायन पनवेल महामार्गावर कोकण भवन येथे समोरच्या गाडीने अचानक ब्रेक मारल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. सुदैवाने या अपघातात मंगेश देसाई व त्यांच्या कुटुंबियांना कोणतीही दुखापत झाली नसून कारचे मात्र मोठे नुकसान झाले आहे.

याबाबत स्वतः मंगेश देसाई यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात त्यांनी ते पूर्णतः सुखरूप असल्याची माहिती दिली आहे. “तुमच्या सगळ्यांचे आणि गणपती बाप्पाचे आशीर्वाद माझ्या पाठीशी असल्याने मला काही होणे शक्यच नाही. मी एकदम व्यवस्थित आहे. फक्त एक छोटासा अपघात झाला आहे ज्यात गाडीचे नुकसान झाले आहे. मात्र माझ्या कुटुंबियांना कोणतीही इजा झालेली नाही. मी आणि माझे सगळे कुटुंबीय सुरक्षित आहोत, असे या व्हिडिओ मध्ये देसाई यांनी सांगितले.
“मला अनेकांचे फोन आले त्यांनी माझी विचारपूस केली. त्यामुळे मी हे सगळ्यांना सांगू इच्छितो की मी एकदम सेफ आहे. तुम्ही सगळ्यांनी एवढी विचारपूस केलीत त्यासाठी धन्यवाद.”