नाशिक (प्रतिनिधी) :- पाथर्डी फाटा येथे कर्तव्यावर असलेल्या वाहतूक पोलिसास मारहाण व धक्काबुक्की करणार्या आरोपीस कोर्टाने सहा महिने साधा कारावास आणि तीन हजार रुपये दंड अशी शिक्षा ठोठावली आहे.

याबाबत माहिती अशी, की दि.5 जानेवारी 2019 रोजी वाहतूक पोलिस नाईक सचिन गोपाळ जाधव यांनी अपघात करणार्या मारुती कारचालकास त्याची गाडी वाहतूक पोलिस चौकीजवळ घेण्यास सांगितली. एमएच 15 डीसी 5183 मध्ये या वाहतूक पोलिसाला बसवून गाडी वाहतूक चौकीऐवजी आरोपी राजेंद्र बळीराम सोनवणे(वय 54, रा.अयोध्यानगरी, पंचवटी) आणि सुनिल धनू जाधव(वय 38, रा.साई अॅव्हेन्यु अपार्टमेंट, समर्थनगर) यांनी ही गाडी पाथर्डी फाट्याकडून अंबड गावाकडे वेगाने नेली. दरम्यानच्या काळात या दोघांनी पोलिस नाई सचिन जाधव यांना मारहाण व शिवीगाळ करुन त्यांच्या युनिफॉर्मची बटणे तोडली, नेमप्लेट तोडली. याप्रकरणी आरोपींविरुद्ध अंबड पोलिस ठाण्यात भा.द.वि.353,323,504,506, 34 तसेच मोटार वाहन कायदा कलम 184, 132, 179 अन्वये गुन्हा दाखल केला होता.
या गुन्ह्याचा तपास तत्कालीन उपनिरीक्षक एम.डी.म्हात्रे यांनी करुन खटला कोर्टात पाठविला. या खटल्याचे कामकाज जिल्हा व सत्र न्यायालय क्रमांक 8 येथील न्या.एम.ए.शिंदे यांच्यासमोर चालले. त्यांनी परिस्थितीजन्य पुरावा पाहून आरोपी राजेंद्र बळीराम सोनवणे यांस भा.द.वि.353 अंतर्गत सहा महिने कारावास व दोन हजार रुपये दंड. तसेच मोटार वाहन कायदा 184 अन्वये दोन महिने साधा कारावास आणि एक हजार रुपये दंड. अशी शिक्षा नुकतीच ठोठावली.
सरकार पक्षातर्फे या खटल्याचे कामकाज सहाय्यक अभियोक्ता अॅड.आर.वाय.सुर्यवंशी यांनी पाहिले