नाशिकरोड (प्रतिनिधी) :– देवळाली गावाजवळील बकालवाडी येथील सार्वजनिक शौचालयाजवळ 9 वर्षीय बालिकेस एकटी गाठून तिचे हात बांधून तिच्यावर लैंगिक अत्याचार व मारहाण करणार्या आरोपीस कोर्टाने दहा वर्षे कारावास व 13 हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे.

याबाबत माहिती अशी, की आरोपी रवींद्र चौहलसिंग बहोत (वय 36, रा. महात्मा गांधी धाम, देवळाली गाव) याने 13 ऑक्टोबर 2017 रोजी देवळाली कॅम्प येथील सार्वजनिक शौचालयाजवळ अल्पवयीन मुलगी शौचालयात गेली असता, ती एकटी असल्याची संधी साधुन तिचे तोंड दाबुन व हाथ बांधून तिच्यावर अत्याचार व मारहाण केली होती. याबाबत आईवडिलांना सांगितल्यास त्यांनाही मारण्याची धमकी दिली होती.

या प्रकरणी उपनगर पोलिसांनी भा. दं. वि. कलम 376, 376 (एन), 376 (आय), 342, 323, 506 व बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा 2012 चे कलम 4, 9 व 12 अन्वये गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी तत्कालीन महिला पोलीस उपनिरीक्षक एस. डी. तेली यांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. या खटल्याचा निकाल अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय (विशेष पोक्सो न्यायालय) न्या. डी. डी. देशमुख यांनी दिला.
त्यानुसार भा. दं. वि. कलम 376 व पोक्सो कायद्यान्वये आरोपी रवींद्र बहोत यास दहा वर्षे सश्रम कारावास व दहा हजार रुपये दंड व दंड न भरल्यास आणखी एक वर्ष सश्रम कारावास अशी शिक्षा ठोठावली, तसेच भा. दं. वि. कलम 506 अन्वये दोन वर्षांचा सश्रम कारावास व एक हजार रुपयांचा दंड, भा. दं. वि. कलम 342 अन्वये एक वर्षाचा सश्रम कारावास व एक हजार रुपये दंड, तसेच भा. दं. वि. कलम 323 अन्वये एक वर्षे सश्रम कारावास व एक हजार रुपये दंड अशी शिक्षा ठोठावली आहे.
या खटल्यात सहाय्यक सरकारी अभियोक्ता दीपशिखा भिडे यांनी काम पाहिले. आरोपीस शिक्षा लागण्याच्या दृष्टीने वेळोवेळी पाठपुरावा करणारे महिला पोलीस उपनिरीक्षक एस. डी. तेली, तसेच पैरवी अधिकारी हवालदार के. के. गायकवाड, अभियोग कक्षाचे पोलीस नाईक एस. सी. शिंदे व तपास पथकाचे गुन्हे शाखा व परिमंडळ 2 उपायुक्तांसह आयुक्त जयंत नाईकनवरे व वरिष्ठ अधिकार्यांनी अभिनंदन केले आहे.