नाशिक (प्रतिनिधी) : शहर परिसरात विनापरवाना अवैधरीत्या देशी दारू कबजात बाळगून विकणार्या दोन जणांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे.
पहिली कारवाई अंबड लिंक रोड येथे करण्यात आली. आरोपी विशाल राजेंद्र पाटील (वय ३१, रा. गौरव निवास, श्रमिकनगर, सातपूर) हा काल सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास अंबड लिंक रोडवरील संजीवनगर येथे इंडियन ऑईल पेट्रोल पंपासमोर ९८० रुपये किमतीच्या प्रिन्स संत्रा देशी दारूच्या २८ बाटल्या बेकायदेशीररीत्या एका पांढर्या रंगाच्या गोणीमध्ये विक्री करण्याच्या उद्देशाने आढळून आला. पोलीस शिपाई मुकेश गांगुर्डे यांच्या फिर्यादीनुसार पाटीलविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुसरी कारवाई वडनेर गेट येथे करण्यात आली. आरोपी सोमनाथ बजरंग अभंग (वय ४३, रा. वडनेर दुमाला, ता. जि. नाशिक) हा काल सायंकाळच्या सुमारास त्याच्या ताब्यातील एमएच १५ एफबी ३६१५ या क्रमांकाच्या मोपेड गाडीच्या डिक्कीमध्ये ४ हजार ४२० रुपये किमतीच्या मॅकडॉल रमच्या ११ बाटल्या, तसेच इम्पिरिअल ब्ल्यू दारूच्या ८ बाटल्या, ऑफिसर चॉईस दारूच्या सात बाटल्या, मॅकडॉल व्हिस्की या दारूच्या बाटल्या विनापरवाना विक्री करण्याच्या उद्देशाने स्वत:जवळ बाळगताना आढळून आला. पोलीस हवालदार गुलाब सोनार यांच्या फिर्यादीनुसार उपनगर पोलीस ठाण्यात सोमनाथ अभंगविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.