मनपाकडून पंचवटी विभागात धडक वसुली मोहीम

 

नाशिक (प्रतिनिधी) :- नाशिक मनपाच्या प्रशासकीय राजवटीत पंचवटी विभागीय कार्यालयाच्यावतीने पंचवटी भागात मनपा गाळेधारक व घरपट्टी-पाणीपट्टी मिळकत थकबाकीदारांकडून वसुली होण्यासाठी विशेष धडक वसुली मोहीम सुरू करण्यात आली आहे.

या विशेष धडक वसुली मोहिमेत घरपट्टी-पाणीपट्टीची थकबाकी न भरणाऱ्या मिळकतींचे नळ कनेक्शन बंद करण्याची कारवाई केली जात आहे. यावेळी या वसुली मोहिम दरम्यान कारवाई टाळण्यासाठी मनपा गाळेधारक व घरपट्टी-पाणीपट्टी मिळकत धारकांनी तात्काळ घरपट्टी-पाणीपट्टी भरावी.असे आवाहन नाशिक मनपाच्यावतीने केले जात आहे.

नाशिक मनपाच्या प्रशासकीय राजवटीत पंचवटी विभागीय कार्यालयाच्यावतीने विभागीय अधिकारी कैलास राभडीया यांच्या नेतृत्वाखाली घरपट्टी-पाणीपट्टी तसेच मिळकत-जाहिरात व परवाने विभागाकडून पंचवटी प्रभागातील प्रामुख्याने म्हसरूळ, मखमलाबाद, आडगांव, नांदूर, हनुमानवाडी, रामवाडी, हिरावाडी, गणेशवाडी, दिंडोरीरोड, पेठरोड, अमृतधाम, हनुमाननगर आदी मुख्य भागात वसुलीची धडक मोहीम सुरू करण्यात आली आहे. या धडक वसुली मोहिमेत संबंधित थकबाकी असलेल्या मिळकतींवर दंडात्मक बरोबरच मिळकत सीलबंदची कारवाई करण्यात येणार आहे. मोहीम यशस्वीतेसाठी मनपा पंचवटी मिळकत,जाहिरात व परवाने विभागाचे सहा.अधिक्षक भुषण देशमुख,मंगेश वाघ,राजेंद्र सोनवणे,दिपक मिंधे,प्रकाश उखाडे,राहुल बोटे,सचिन गवळी,संजय बोरसे आदींसह घरपट्टी-पाणीपट्टी विभागाचे सर्व अधिकारी व कर्मचारी प्रयत्नशील आहेत.

या धडक वसुली मोहिमेत थकबाकीदार बरोबरच चालू वर्षीचे संपूर्ण बील भरणा करण्यासाठी पंचवटी प्रभागात यापूर्वीच महारँली काढण्यात आली आहे. तर आजही ध्वनी प्रक्षेपणद्वारे घरपट्टी-पाणीपट्टी संदर्भात कर भरा..सहकार्य करा..दंडात्मक कारवाई टाळा..मिळकत सीलबंद किंवा नळ कनेक्शन बंद करण्याची कटू कारवाई टाळा..! या घोषवाक्यात ठिकठिकाणी जनजागृती करण्यात येत आहे. त्यास थकबाकीदार गाळेधारक बरोबरच घरपट्टी-पाणीपट्टी भरण्यासाठी मिळकत धारकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. तर दुसरीकडे मनपाकडून काही थकबाकी मिळकत धारकांना आपली थकबाकी रक्कम भरण्यासाठी वारंवार तगादा देऊनही आज रक्कम मनपाकडे जमा न करणाऱ्या मिळकत धारकांचे गाळे व घरपट्टी-पाणीपट्टी संदर्भातील मिळकतींना सीलबंद केले जाणार आहे. यापूर्वी सध्या मनपा गाळे व घरपट्टी – पाणीपट्टीची कर स्वरूपातील रक्कम तात्काळ भरून पुढील दंडात्मक कारवाई टाळण्याचे आवाहन मनपाच्यावतीने केले जात आहे. याशिवाय आज मनपाचे गाळेधारक व घरपट्टी-पाणीपट्टीची थकबाकी आणि चालू असलेली रक्कम जमा न करणाऱ्या मिळकत धारकांवर कठोर कारवाई राबविली जाणार आहे.

दरम्यान,या धडक वसुली मोहीम प्रसंगी संबंधित थकबाकीदार गाळेधारक तसेच घरपट्टी – पाणीपट्टी मिळकत धारकांनी तात्काळ चालू रक्कम बरोबरच थकबाकीची रक्कम भरून होणारी मिळकत सीलबंद किंवा नळ कनेक्शन बंद करण्याची कटूकारवाई टाळावी.असे आवाहन घरपट्टी-पाणीपट्टी आणि मिळकत- जाहिरात व परवाने विभागाकडून करण्यात येत आहे.आज त्यानुसार प्रामुख्याने पंचवटी भागातील गाळेधारक व घरपट्टी-पाणीपट्टी थकबाकीदारांकडून रक्कम वसूल करण्यात येत आहे. त्यास संबंधित मिळकत धारक नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.अशी माहिती मनपा पंचवटी विभागीय अधिकारी कैलास राभडीया यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!