ओझरच्या मृतदेहाचे गूढ उकलले, महिलेसह दोघांना अटक

नाशिक (प्रतिनिधी) :- प्रेमप्रकरणात तरुणावर दबाव टाकल्याने त्याने आत्महत्या केल्यानंतर त्याच्या मृतदेहाची मोटारसायकलीवरून वाहतूक करून ओझरजवळ नववा मैल येथे फेकून दिल्याप्रकरणी संबंधित महिला, तिचा मुलगा व आणखी एक युवक अशा तिघांना आडगाव पोलिसांनी अटक केली आहे.

याबाबत माहिती अशी, की आडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत नववा मैल, एच पी पेट्रोल पंपाजवळ येथील मोकळ्या जागेत एका बेवारस तरुणाचा मृतदेह पडलेला आहे, अशी खबर आडगाव पोलिसांना दि. 26 फेब्रुवारी रोजी मिळाली होती. पोलिसांनी त्याची दखल घेत मृतदेह ताब्यात घेऊन जिल्हा रुग्णालयात पोस्टमार्टेम केले. यावेळी या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान, ही हत्या की आत्महत्या याचा तपास करीत असताना गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक तोडकर यांना संबंधित मयत तरुणाचे नाव रमेश रवींद्र मोरे (वय 25, रा. कंडोरी, कोळी वाडा, ता. भुसावळ, सध्या रा. ओझर) असे असल्याचे समजले; मात्र आत्महत्येचे कारण समजत नव्हते. दरम्यान, पोलिसांनी गुप्त बातमीदारामार्फत माहिती काढली असता मयत तरुणाचे छाया गांगुर्डे या महिलेशी एक वर्षापासून प्रेमसंबंध होते. मयत रमेशचे वय 25, तर या महिलेचे वय 42 वर्षे आहे. वयात मोठा फरक असूनही ही महिला मयत रमेशवर माझ्याशी लग्न कर म्हणून दबाव टाकत होती. नेहमीच होणार्‍या या प्रकारास कंटाळून रमेशने स्वत:च्याच घरात गळफास घेऊन आत्महत्या केली होती.

मात्र या आत्महत्येचा दोषारोप आपल्यावर येऊ नये म्हणून या महिलेने तिचा मुलगा तुषार रवींद्र गांगुर्डे (वय 19) व त्याचा मित्र आकाश शिवाजी पवार (वय 21) याच्या मदतीने मयत रमेशचा मृतदेह मोटारसायकलीवर टाकून नववा मैल येथील मोकळ्या जागेत टाकून दिला व आत्महत्येचा पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला; मात्र पोलीस तपासात शेवटी बिंग फुटलेच.

या प्रकरणी आडगाव पोलिसांच्या गुन्हेशोध पथकाने छाया रवींद्र गांगुर्डे (वय 42) आणि तुषार रवींद्र गांगुर्डे (वय 19, दोघेही रा. मिलिंदनगर, किराणा दुकानाच्या बाजूला, राजवाडा, ओझर मिग) व तुषारचा मित्र आकाश शिवाजी पवार (वय 21, रा. तांबट गल्ली, मर्चंट्स बँकेसमोर, ओझर मिग) या तिघांना अटक केली असून, त्यांना न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली.

हा गुन्हा उकलण्यासाठी सहाय्यक पोलीस आयुक्त मधुकर गावित व वरिष्ठ पोलीस निरीक्षक इरफान शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, उपनिरीक्षक सुभाष जाधव, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक भास्कर वाढवणे, हवालदार सुरेश नरवडे, पोलीस नाईक विजयकुमार सूर्यवंशी, दशरथ पागी, कॉन्स्टेबल सचिन बाहीकर, वैभव परदेशी व देवानंद मोरे यांच्या पथकाने खुनाच्या गुन्ह्याची उकल केली. त्यांना तांत्रिक विश्‍लेषण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बेडवाल व आडगाव पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक पाथरे, हवालदार बस्ते, भुसारे व कॉन्स्टेबल नितीन शिंदे यांनी सहकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!