अयोध्या: राज्याचे पर्यावरण मंत्री आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे आज अयोध्या दौर्यावर आले आहेत. त्यावेळी पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले की, येथे आम्ही राजकारण करण्यासाठी आलो नसून तिर्थयात्रेसाठी आलो आहोत. या ठिकाणी राजकीय विषय काढणे उचित नाही. आमचे हिंदुत्व स्पष्ट आहे. अयोध्यात महाराष्ट्र सदन बांधणार असल्याचे ते म्हणाले. तसेच मुंबई महापालिकेमध्ये रामराज्य येणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

दोन वर्षांनंतर अयोध्या दौर्यावर आलो आहे, उत्साह तोच आहे. माझ्यासोबत सर्व शिवसैनिक आले आहेत. अयोध्यामध्ये 100 खोल्यांचे महाराष्ट्र सदन बनवण्यासाठी प्रयत्न आहे. त्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांशी पत्रव्यवहार करणार आहेत अशी माहिती आदित्य ठाकरे यांनी दिली.

आदित्य ठाकरे यांनी यावेळी कोणत्याही राजकीय विषयावर बोलण्याचे टाळले. शिवसेना या ठिकाणी शक्तीप्रदर्शन करण्यासाठी आले आहे का? या प्रश्नावर बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, आमची भक्ती हीच आमची शक्ती आहे, त्यामुळे आम्हाला शक्तीप्रदर्शनाची गरज नाही. आमच्या हातून महाराष्ट्राची सेवा व्हावी यासाठी प्रभू रामाकडे साकडे घालण्यासाठी आलो असल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले.
मी 2018 मध्ये पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत पहिल्यांदा अयोध्यामध्ये आलो होतो. तेव्हा त्यांनी पहिले मंदिर फिर सरकार, अशी घोषणा केली होती. त्या घोषणेनंतर योगायोगाने आम्ही नोव्हेंबर 2018 मध्ये आलो. ती घोषणा झाल्यानंतर कदाचित असं पूर्ण घडून आलं. त्यानंतर कोर्टाच्या प्रक्रियेला चालना मिळाली. एका वर्षात बरोबर नोव्हेंबर 2019 मध्ये कोर्टाचा निकाल आला. कोर्टाच्या निकालामुळे आज इथे मंदिर निर्माण होत आहे. आम्ही कर्टाचे आभार मानत आहोत”, असं आदित्य ठाकरे म्हणाले.