नाना खैरनार
नाशिक :- देवाने आपणास सर्व काही दिले आहे आणि समाजाकडून आतापर्यंत आपणास भरपूर मिळाले आहे. परंतु आपण समाजाचे काहीतरी देणं लागतो. हाच विचार मनाशी बाळगून असलेले अॅड. बालमुकुंद शिंपी यांच्याबाबत असेच म्हणता येईल. नाशिकच्या गोल्फ क्लब मैदानावर अॅड. बालमुकुंद शिंपी हे मोफत अॅक्युप्रेशरद्वारे अनेक रुग्णांची मोफत सेवा करताना दिसून येत आहेत. आजपर्यंत त्यांनी पाचशे ते सहाशे लोकांवर मोफत उपचार केले आहेत.

अॅड. शिंपी हे रोज पहाटे पाच ते सकाळी सात या वेळात मैदानावर येत असतात. अशा वेळी ते स्वतः व्यायाम करत असतात. त्यात प्राणायामसारखा व्यायाम ते करत असतात. मात्र अशावेळी कोणी रुग्ण म्हटला की, मला अॅसिडिटी, कंबरदुखी, पाठदुखी किंवा इतर काही आजार आहे, असे सांगताच त्यावेळी अॅड. शिंपी हे अॅक्युप्रेशरद्वारे त्या रुग्णावर मोफतपणे ताबडतोब इलाज करत असतात. सुरुवातीला रुग्णाच्या चेहर्यावर असलेला त्रासदायक भाव उपचारानंतर सहजगत्या नाहीसा झालेला असतो आणि रुग्ण हसत हसत घरी जातो. हे पाहिल्यावर अॅड. शिंपी यांना मनोमन खूप समाधान वाटते आणि आपण काहीतरी चांगल केल्याचा आनंद त्यांना मिळतो.

शिंपी यांना सुरुवातीपासूनच व्यायामाची आवड होती. लहानपणापासूनच बलदंड शरीर करायचं, हा त्यांचा ध्यास होता. तरुणपणी आणि वय होत असतानाही त्यांनी व्यायाम सोडला नाही. मात्र वयाची साठी उलटल्यानंतर हे बलदंड शरीर कायम राहिले,पण हालचाल करायला थोडा अवघड होत होतं. अवजड शरीर असल्यामुळे शारीरिक हालचाली थोड्या मंदावल्या होत्या. त्यामुळे आपण योगाकडे वळायला पाहिजे असे त्यांना वाटले. त्याचवेळी ते योगा क्लासलाही जाऊ लागले. खर्डे सरांकडे ते प्रशिक्षण घेऊ लागले. त्यानंतर योगामध्ये त्यांची आवड निर्माण होत गेली आणि ते स्वतः क्लास घेऊ लागले. या दरम्यान हरिद्वार येथे रामदेव बाबा यांचेकडे अधिक प्रशिक्षणासाठी ते गेले. त्यांच्याकडून सलग दहा ते बारा दिवस योगाचे आणि अॅक्युप्रेशरचे प्रशिक्षण घेतले. नाशिकला आल्यानंतर त्यांनी स्वतःचे क्लास सुरू केले. सुरुवातीला पंडित कॉलनी येथे आणि त्यानंतर कालिका मंदिरमध्ये त्यांनी योगाचे क्लास घेतले. त्याचबरोबर पोलीस प्रशिक्षण घेणार्या युवकांनाही ते योगाचे धडे देऊ लागले. आतापर्यंत त्यांनी अनेक तरुणांना योगाचे धडे दिले आहेत.
अॅड. शिंपी यांचे वय 71 असले तरी त्यांच्या चेहर्यावर वयाचा अजिबात थकवा दिसून येत नाही. उलटपक्षी इतर रुग्णांना ते बरे करायचा प्रयत्न करत असतात. अॅक्युप्रेशरमध्ये ते मॅग्नेट, दोरी, मेथीचे दाणे अशा विविध गोष्टींचा उपयोग ते करत असतात. कान, नाक, कंबर, डोके यासारख्या अवयवांना त्रास होत असेल तर ते झटपट बरे करतात. मात्र त्यासाठी कोणतीही फी घेत नाहीत. अनेक वर्षे वकिली केल्यानंतर शिंपी हे अॅक्युप्रेशरद्वारे समाजसेवा करत आहेत. सध्या ते पंचवटीतील हनुमानवाडी येथील प्रोफेसर कॉलनी, नागरे मळा, बंगला नंबर 36-37 येथे राहतात.
तेथेही ते घरी माफक दरात घरी उपचार करत असतात एखाद्या रुग्णाला त्यांच्याशी संपर्क साधायचा असल्यास किंवा काही त्रास असल्यास अशा रुग्णांनी त्यांच्याशी 9422245058 क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहनही त्यांनी केले आहे.
शिंपी यांचे शिक्षण बीएससी, एलएलबी, एलएलएम इथपर्यंत झाले असून काही काळ त्यांनी वकिलीही केली आहे. ते नामवंत वकील म्हणून देखील नाशिककरांना परिचित आहेत. समाजाप्रती आपल्याला काहीतरी सेवा करता यावी, हाच आपला उद्देश असल्याचे अॅड. शिंपी सांगतात.
अॅड. शिंपी हे गेल्या अनेक वर्षापासून अॅक्युप्रेशरद्वारे रुग्णांवर उपचार करीत आहेत. मला देखील पाठदुखीचा त्रास होत होता, मात्र त्यांनी एका दिवसात त्याच्यावर उपचार करून मला त्या त्रासापासून दूर केले. माझ्या मित्राला देखील निद्रानाशाचा त्रास होता, मात्र त्यांचा सल्ला आणि उपचार, यामुळे तो देखील या त्रासापासून मुक्त झाला.
-मंगेश शिरसाठ,प्रशिक्षक, क्रिकेट