नाशिक कोर्टासाठी जागा मिळवून देण्यात अग्रभागी असलेले वकील : का. का. घुगे

दैनिक भ्रमरच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त 50 वर्षे आपल्या व्यवसायास किंवा प्रोफेशनला झालेल्या नाशिकमधील व्यक्तींचा प्रवास “भ्रमरचे सहप्रवासी” या सदराखालील आम्ही मांडणार आहोत. आज जाणून घेऊया ज्येष्ठ विधिज्ञ का.का. घुगे यांचा जीवनप्रवास

 

ज्येष्ठ विधिज्ञ का. का. घुगे यांनी सहकार क्षेत्रात विधिज्ञ म्हणून भरीव योगदान दिले. राज्य सरकारतर्फे त्यांची गृहनिर्माण संघासाठी वकील म्हणून सन 1980 मध्ये नियुक्ती करण्यात आली. सन 2020 पर्यंत त्यांनी यासाठी काम केले. एस. टी. महामंडळासाठीही त्यानी 20 वर्षे वकील म्हणून न्यायदानात योगदान दिले. सिडकोतील जमीन अधिग्रहित केल्यानंतर त्या शेतकर्‍यांना त्यांनी भरीव मोबदला मिळवून दिला. नाशिक कोर्टाला जागा मिळवून देण्यासाठी त्यांनी जनहित याचिका दाखल केली. त्याला यश आले व आज कोर्टाची नवीन इमारत त्याच जागेवर उभी आहे. वयाच्या 77 व्या वर्षीही ते नागरिकांना कायद्याचे मोफत मार्गदर्शन करीत आहेत.

सन 1975 मध्ये नवी दिल्ली येथे आयोजित वकील परिषदेनिमित्त तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भेट घेण्यात आली. याप्रसंगी कायदामंत्री हरिभाऊ गोखले, अ‍ॅड. बाबूराव ठाकरे, अ‍ॅड. का. का. घुगे.

का. का. घुगे यांचा जन्म निफाड तालुक्यातील ओणे या गावी एका सधन शेतकरी कुटुंबात झाला. त्याचे काका शिक्षक असल्यामुळे आणि आर्थिक परिस्थिती चांगली असल्याने का. का. घुगे यांना घरातूनच शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळत गेले. प्रांरंभी गावात आणि नंतर नाशिकला येऊन त्यांनी पदवी पर्यंत शिक्षण घेतले. का. का. घुगे यांना पहिल्यापासूनच इंजिनिअरिंग किंवा वैद्यकीय व्यवसायात रस नव्हता. त्यामुळे पदवीनंतर त्यांनी पुण्यात आपले गुुरू तथा स्नेही भास्करराव आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली सन 1970 मध्ये आय. एल. एस. लॉ कॉलेजमधून विधी शिक्षण पूर्ण केले.

ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कवी कुसुमाग्रजांसमवेत अ‍ॅड. का. का. घुगे.

1971 मध्ये वकिलीची सनद मिळाल्यानंतर का. का. घुगे यांनी नाशिकला परतून अ‍ॅड. बाळासाहेब भिडे यांचे सहाय्यक वकील म्हणून तीन ते चार वर्षे काम केले. पुण्यातील भास्करराव आव्हाड यांनी का. का. घुगे यांना मार्गदर्शन, केले. सन 1977 मध्ये त्यांनी सहकार क्षेत्रातील संस्थासाठी वकिली केली. त्या काळात त्यांनी कायदा सल्लागार म्हणूनही काम केले. त्याचा अनुभव घेऊन त्यांनी सहकार क्षेत्रात वकिलीचा जम बसविला. त्या काळात सहकार क्षेत्रासाठी भरभराटीचा व संपन्न अवस्थेत होता.
माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण व वसंतदादा पाटील यांसारख्या राजकीय नेतृत्वाने सहकार चळवळीला उत्तम गती दिली. त्यामुळे सहकारी साखर कारखाने, सहकारी संघ, सूतगिरण्या या आणि अशा संस्था संपन्न अवस्थेत होेत्या. त्यामुळे या क्षेत्रात वकील म्हणून काम करण्याचा अनुभव त्यांना मोठा अनुभव देऊन गेला. अल्पावधीतच सहकार क्षेत्रात त्यांचे वकील म्हणून कार्य नावाजले गेले.

जहांगीर आर्ट गॅलरी मुंबई येथे न्या. डी. जी. देशपांडे यांच्या कलाकृती प्रदर्शनाच्या उद्घाटनानिमित्त आलेले सिनेअभिनेते अमिताभ बच्चन यांच्या समवेत अ‍ॅड. का. का. घुगे.

याच काळात त्यांच्याकडे भूसंपादन क्षेत्रात वकील म्हणूनही मोठे काम केले. सिडको येथील गृहप्रकल्पासाठी शेतकर्‍यांची पंधराशे एकर जागा घेण्यात आली. त्या जागेच्या भूसंपादनात वकील म्हणून का. का. घुगे यांनी वकिली करून अनेक शेतकर्‍यांना त्यांनी दिलेल्या जमिनीसाठी योग्य मोबदला मिळवून दिला. भूसंपादन, जमीन अधिग्रहण क्षेत्रात त्यांनी अनेक वर्षे काम करून त्यांनी वकील म्हणून महत्त्वपूर्ण योगदान दिले.

दरम्यान, का. का. घुगे यांची राज्य सरकारतर्फे गृहनिर्माण संघासाठी वकील म्हणून सन 1980 मध्ये नियुक्ती करण्यात आली. सन 2020 पर्यंत त्यांनी यासाठी काम केले. एस. टी. महामंडळासाठीही त्यानी 20 वर्षे वकील म्हणून न्यायदानात योगदान दिले. सन 1987 म्हणून महाराष्ट्र सरकारने त्यांची सरकारचा नोटरी म्हणून नेमणूक केली. त्या काळात त्यांनी धुळे, अहमदनगर व नाशिक या जिल्ह्यांत काम केले.

माजी मुख्यमंत्री स्व. विलासराव देशमुख यांचे स्वागत करताना अ‍ॅड. का. का. घुगे.

सन 1998 मध्ये का. का. घुगे यांनी महाराष्ट्र बार कौन्सिलची निवडणूक लढविली. कौन्सिलमध्ये प्रारंभी सदस्य व नंतर 2002 मध्ये त्यांनी महाराष्ट्र बार कौन्सिलचे अध्यक्षपदही भूषविले. बार कौन्सिलच्या अध्यक्षपदी असताना का. का. घुगे देशभरात विविध परिषदा व व्याख्यानांच्या कार्यक्रमात सहभागी होत गेले. तेथे त्यांनी सक्रिय सहभाग नोंदविला. अनेक चर्चासत्रांत व्याख्याते, विविध न्यायाधीश यांना ऐकण्याची संधी मिळावी म्हणून काम केले. त्या अनुभवांना वृतपत्रात लेखनाचे स्वरूप देऊन प्रसिद्ध केले. वृत्रपत्रातील ते लेख मग पुस्तक रूपात प्रसिद्ध करण्याचे ठरवले आणि त्यांच्या पहिल्या पुस्तकाचे प्रकाशन झाले. अशी त्यांची दोन पुस्तके प्रकाशित झाली आहेत. आज ते अनेकांना मोफत कायद्याचे मार्गदर्शन करीत आहेत.

सहकार क्षेत्रात तीन दशकांहून अधिक काम केलेले अ‍ॅड. का. का. घुगे यांना आजच्या सहकार क्षेत्राकडे पाहिल्यानंतर अत्यंत खंत वाटते, ते म्हणतात, आजचे सहकार क्षेत्र अत्यंत बरबटलेले आहे. त्याकडे पाहिल्यानंतर वाईट वाटते. आज सहकार क्षेत्रात राजकारणी लोकांची मक्तेदारी आहे आणि निवडणुका जिंकण्यासाठी असे पुढारी सहकार क्षेत्राचा दुरुपयोग करतात, याबद्दल ते नाराजी व्यक्त करतात. आज जगाची वाटचाल उदारीकरण व जागतिकीकरणाकडे होत असताना सहकार क्षेत्र राहणार की नाही अशी मला भीती वाटते. मुळात सहकाराची भावनाच लोप पावली आहे, असे ते खेदाने नमूद करतात.

नाशिकमध्ये जेव्हा एकही पोहण्याचा तलाव नव्हता, त्यावेळी का. का. घुगे नित्यनियमाने पहाटे फिरण्याचा व्यायाम करीत असत. सन 1985 मध्ये पहिला जलतरण तलाव झाला, तेव्हापासून आजपर्यंत त्यांनी पोहण्याची आवड जोपासली. का. का. घुगे यांनी कोरोनाचा काळ सोडला, तर आजपर्यंत अनेक वर्षे पोहण्याचा नित्यक्रम सोडला नाही. आजही वयाच्या 77 व्या वर्षी ते निरायम आयुष्यासाठी नियमित फिरण्याचा व्यायाम करतात. उतारवयात त्यांनी समाजसेवेचे व्रतही सोडले नाही. आज त्यांच्याकडे येणार्‍या नागरिकांना व व्यक्तींना ते कायद्याचे मार्गदर्शन मोफत करतात. गेली 50 वर्षे विधी क्षेत्रात योगदान देत असलेले का. का. घुगे आज आयुष्याच्या सायंकाळी अतिशय कृतार्थतेचे जीवन जगत आहेत. आजही वृत्रपत्रे, पुस्तके वाचन, व्यायाम, निरोगी जीवनशैली व शिस्तप्रिय आचरण यांचा आदर्श त्यांनी नवीन पिढीसमोर ठेवला आहे. नीतिमत्ता, प्रामाणिकपणा व सचोटीने वकिली व्यवसायाला स्वत:च्या उंचीवर नेऊन त्यांनी आदर्श विधिज्ञ होण्याचा वस्तुपाठ नवीन पिढीसमोर ठेवला आहे.

न्यायालयालाही न्याय मिळवून दिला
पोलीस विभागाच्या मालकीची जागा नाशिक कोर्टासाठी देण्यात यावी यासाठी अ‍ॅड. का. का. घुगे तत्कालीन मुख्यमंत्री तथा आपले वर्गमित्र विलासराव देखमुख यांना भेटून विनंती केली. मुख्यमंत्र्यांनीही तत्काळ ही जागा नाशिक कोर्टासाठी देण्यात यावी, असे पत्र दिले. अ‍ॅड. का. का. घुगे यांनी त्यासाठी अविरत पाठपुरावा केला; मात्र जागा देण्यास होत असलेल्या दिरंगाईमुळे अ‍ॅड. का. का. घुगे यांनी नाशिक कोर्टात यासंदर्भात एक जनहित याचिका दाखल केली. या याचिकेच्या सुनावणीत त्यावेळी मकरंद कर्णिक यांनी युक्तिवाद केला. सचिन गिते यांनी सहाय्यक वकील म्हणून काम केले. जयंत जायभावे यांचे या याचिकेसाठी मोठे सहकार्य लाभले. जस्टिस अभय ओक यांच्या न्यायापीठाने पोलीस विभागाची अडीच एकर जागा नाशिक कोर्टासाठी देण्यात यावी, असा निवाडा दिला. हा लढा नाशिकमध्ये मोठा महत्त्वपूर्ण ठरला. एक प्रकारे न्यायालयाही न्याय मिळवून देणारे वकील म्हणून त्यांचा नावलौकिक झाला आहे.

नाशिक सुंदर, जीवनमान साधे – सभ्य आणि सुसंस्कृत
जुन्या काळात नाशिकचे रूप अत्यंत चांगले होते, असे का. का. घुगे सांगतात. धार्मिक पर्यटन केंद्र असल्यामुळे येथील वातावरण धार्मिकच होते. लोकांवर देवाधर्माचा पगडा असल्याने नागरिक सभ्य, सुसंस्कृत व भोळे होते. त्यावेळी सर्वांकडे सायकल असे. श्रीमंतीचा बडेजाव नव्हता. चारचाकी गाडी हाताच्या बोटावर मोजण्याइतक्याच धनिकांकडे असे; मात्र त्यांनाही त्याचा गर्व नसे. सर्वच नागरिक सायकलीवरून कामाच्या स्थळी जात. सार्वजनिक वाहतुकीसाठी टांगे लोक वापरत.

रेल्वे स्टेशनला जाण्यासाठी खास टांगेच वापरले जात. शहर खूपच छोटे टुमदार होते. वाडा संस्कृती व कौलारू घरे शहराच्या सौंदर्यात भर घालत. गोदावरीमुळे नाशिक सुंदर दिसे. टोलेजंग इमारती नव्हत्या. घनदाट झाडी, भरपूर पाऊस आणि थंड हवेचे ठिकाण जसे असते, तसेच हे शहर होेते. शहराची वस्ती जुने नाशिक आणि गोदाकाठीच होती. रविवार कारंजापासून अशोकस्तंभापर्यंतच्या सर्कलमध्येच नागरिक वाड्यात राहत. पुढे सर्वच मोकळा परिसर होता. लोकांमध्ये माणुसकी मोठी दिसे.

लोक अडीअडणीला धावून जात. एकोपा आणि सहचर्य होते. मदतीची वृत्ती 80 च्या दशकापर्यंत होती. आकाशवाणी हे मनोरंजनाचे साधन असे. वृत्तपत्रे व ग्रंथालयातील पुस्तकांचे वाचन करणे ही जीवनशैलीच होती. लोक सुखी, समाधानी व कमी पैशातही आनंदी राहत होते, हेच नाशिकचे वैशिष्ट्य होते. गंगेवर सर्वच गोष्टी मिळत, आईस्क्रीम, भेळ, पाणीपुरी, चटकमटक खाण्यासाठी सारेच गोदाघाटी रामकुंड परिसर, देवमामलेदार पटांगणावर जात असत. वसंत व्याख्यानमाला हे शहराचे वैभवच आहे. तेथे मोठमोठे वक्ते, राजकारणी, लेखक व कलाकार येत, त्यांना ऐकणे हा सुखद अनुभव होता!

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!