नाशिक (प्रतिनिधी) :– मोबाईल केवायसीच्या नावाने अॅप डाऊन करण्यास सांगून एका ज्येष्ठ वकिलाला एक लाख रुपयांचा ऑनलाईन गंडा घालण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी नामदेव शिवनाथ गिते (वय 62, रा. न्यू कालिका सोसायटी, नाशिक) हे ज्येष्ठ वकील आहेत. दि. 20 मे रोजी सकाळी साडेनऊ वाजता गिते हे घरी असताना 9668731885 या क्रमांकाच्या मोबाईलवरून सिमकार्ड केवायसीच्या बहाण्याने अज्ञात इसमाने फोन केला. हे कार्ड 24 तासांत अपडेट न केल्यास नंबर लॉक होईल, असे गिते यांना सांगितले. त्यानुसार अज्ञात व्यक्तीने गिते यांना 9883105121 या क्रमांकावर व्हॉट्सअॅप मेसेज आला.

त्यानंतर गिते यांनी संबंधित अज्ञात व्यक्तीस कॉल केला असता प्ले स्टोअरमधून रिचार्ज क्यू अॅप इन्स्टॉल करण्यास सांगितले. त्यानंतर गिते यांना मोबाईलवर पुन्हा केवायसी क्विक सपोर्ट अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यास सांगितले. त्यावेळी फिर्यादीसोबत फोनवर बोलणे चालू ठेवून फिर्यादी यांच्या एसबीआय बँकेचे संपूर्ण डिटेल घेऊन अज्ञात इसमाने 9.36 ते 10.57 यादरम्यान गिते यांच्या 32111674536 या सेव्हिंग अकाऊंटमधून 99 हजार 999 रुपये काढून घेत गिते यांची फसवणूक केली.
ही बाब लक्षात आल्यानंतर गिते यांनी मुंबई नाका पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाविरुद्ध फिर्याद दिली असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक अहिरे करीत आहेत.