भुजबळ यांच्यानंतर शिंदे-फडणवीस सरकारमधील ‘या’ नेत्याला कोरोनाची लागण

कोरोनाने राज्यात पुन्हा डोकं वर काढले आहे. माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्यानंतर आता शिंदे-फडणवीस सरकारमधल्या मंत्र्याचीही कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. राज्याचे उत्पादन शुल्कमंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांना कोरोनाची लागण झाली असून काल रात्री त्यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यांनी स्वतःचा याबाबत ट्विट करत माहिती दिली.

सध्या आयसोलेशनमध्ये असून घरीच डॉक्टर्सकडून उपचार घेत असल्याचे शंभूराज देसाई यांनी म्हटले आहे. त्यांच्यावर साताऱ्यातील घरीच उपचार सुरू करून त्यांना विलगिकरण करून ठेवण्यात आले आहे.

मात्र भुजबळ आणि शंभूराज देसाई यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानं इतर आमदारांचे टेन्शन वाढले आहे. नुकत्याच झालेल्या अधिवेशनात भुजबळ आणि देसाईसुद्धा अनेक आमदारांच्या संपर्कात आले होते.

दरम्यान काल कोरोना रिपोर्ट येण्यापूर्वी शंभूराज देसाई त्यांच्या मरळी गावच्या श्री निनाईदेवीच्या यात्रेत सहकुटुंब सहभागी झाले होते. या यात्रेतील मिरवणुकीत शंभुराज देसाई यांनी गाण्याच्या तालावर ठेका देखील धरला होता. यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. आता खुद्द शंभूराजेंचं कोरोना पॉझिटिव्ह आढळले असल्याने त्यांच्या संपर्कात आलेल्या ग्रामस्थांची चिंता वाढली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!