पंकजा मुंडेंच्या मेळाव्यानंतर कार्यकर्त्यांचा मोठा गोंधळ; पोलिसांचा लाठीजार्ज

बीड : पंकजा मुंडेंच्या भगवान गडावरील मेळाव्यानंतर गोंधळ उडाल्याचे पहायला मिळाला. मोठ्या प्रमाणावर गर्दी जमा झाल्याने पोलिसांनी यावेळी लाठीचार्जही करावा लागला. पंकजा मुंडेंच्या भाषणाच्या सुरुवातीलाही काही कार्यकर्त्यांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला होता.

दरम्यान, पंकजा मुंडेंच्या या दसरा मेळाव्याला प्रचंड गर्दी झाली होती. ज्यावेळी पंकजा मुंडे या भाषणासाठी व्यासपीठावर दाखल झाल्या त्यानंतरही काही हुल्लडबाज तरुणांनी पोलिसांशी हुज्जत घालत गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी पंकजा मुंडेंनी या कार्यकर्त्यांना व्यासपीठावरुनच शांत राहण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर हा गोंधळ थांबला.

परंतु, जेव्हा पंकजा मुंडेंचे भाषण संपले आणि त्या व्यासपीठावरुन खाली उतरुन आपल्या ताफ्याकडे गेल्या त्यानंतर तरुणांची गर्दी ही व्यासपीठाच्या दिशेने जाऊ लागली. यावेळी समर्थक कार्यकर्त्यांना बाजूला होण्याचे आवाहन पोलीस करत होते. परंतु प्रचंड गर्दी झाल्याने कोणीही बाजूला होत नव्हते. अखेर पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला आणि त्यानंतर ही गर्दी पांगली.

सुमारे आठ ते दहा मिनिटे हा गोंधळ सुरु होता. त्यानंतर काही वेळाने आणखी पोलीस कुमक तिथं बोलवावी लागली. त्यानंतर पंकजा मुंडे यांची गाडी रवाना करण्यात आली. सुरुवातीला खासदार प्रितम चव्हाण यांनी देखील समर्थकांना भागवान बाबांची शांततेची शिकवण असल्याचे सांगत शांत राहण्याचे आवाहन केले होते. पण तरीही काही उत्साही कार्यकर्ते शांत राहण्याच्या मनस्थितीत नसल्याने गोंधळ सुरु होता.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!