नवी दिल्ली (भ्रमर वृत्तसेवा):- श्रीलंकेतील आर्थिक संकटामुळे दिवसेंदिवस ढासळणारी परिस्थिती आणि राष्ट्रपतींनी देश सोडल्याची घटना याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. भारताकडून शेजारी राष्ट्र श्रीलंकेला शक्य ती सर्व मदत केली जात आहे. पण तिथली परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. श्रीलंकेपाठोपाठ पाकिस्तानही दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर उभा असल्याचे वृत्त आहे. पाकिस्तानच्या आर्थिक स्थितीबाबत जगातील आघाडीच्या रेटिंग एजन्सीने इशारा दिला आहे. एजन्सींकडून आर्थिक संकट कोसळण्याची भीती निर्माण झाली आहे.

आंतरराष्ट्रीय संस्थांच्या मते, पाकिस्तानच्या परकीय चलन साठ्यात लक्षणीय घट झाली असून कर्जाचा बोजा दिवसेंदिवस वाढत आहे. चिंतेचे आणखी एक मोठे कारण म्हणजे जगात मंदीच्या चर्चांमुळे पाकिस्तानात नोकर्यांची संख्या कमी होत आहे. पाकिस्तानातील ढासळणारी अर्थव्यवस्था लक्षात घेता परकीय गुंतवणूकदारांनी पाकिस्तानला पाठ दाखवली आहे.
फिचने 17 देशांची यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये पाकिस्तान, ट्युनिशिया, घाना, इथिओपिया, ताजिकिस्तान, अर्जेंटिना, बेलारूस इत्यादी देशांचा समावेश आहे. एजन्सीने जारी केलेल्या अहवालात पाकिस्तानच्या ढासळत्या अर्थव्यवस्थेमुळे दिवाळखोरी होण्याची भीती व्यक्त केली गेली आहे.
पाकिस्तानचा परकीय चलनाचा साठा 10 अब्ज डॉलरच्या खाली गेला आहे. देशातील महागाईचा दर 20 टक्क्यांच्या पुढे गेला आहे. डॉलरच्या तुलनेत पाकिस्तानी रुपया घसरला असून 200 रुपयांच्या पुढे गेला आहे. हा त्याचा विक्रम आहे.
पाकिस्तानवरील कर्जाचा बोजा सातत्याने वाढत आहे. ज्या देशांशी पाकिस्तानचे व्यापारी संबंध आहेत, तेथे मंदीच्या भीतीने व्यापारात घट झाली आहे.