तीन दिवसांनंतर अखेर भारतीय कुस्तीपटूंचे आंदोलन मागे; ब्रिजभूषण यांच्या बाबत “हा” घेतला मोठा निर्णय

नवी दिल्ली : भारतीय कुस्ती फेडरेशनचे अध्यक्ष ब्रिजभूषण सरन सिंग यांच्या विरोधात संपावर गेलेल्या कुस्तीपटूंनी शुक्रवारी (दि. २०) उशिरा केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांच्याशी चर्चा केल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. ब्रिजभूषण सरन सिंग यांच्यावर करण्यात आलेल्या लैंगिक अत्याचाराच्या आरोपानंतर भारतीय ऑलिंपिक संघटनेने सात सदस्यांची चौकशी समिती स्थापन केली. या समितीला चार आठवड्यामध्ये तपास पूर्ण करून अहवाल सादर करावा लागणार आहे. या अहवालाच्या आधारे सरकार अंतिम निर्णय घेणार आहे.

गेल्या तीन दिवसांपासून देशभरात चर्चेत आलेले भारतीय कुस्तीपटूंचे धरणे आंदोलन अखेर शुक्रवारी मध्यरात्री मागे घेण्यात आले. यासंदर्भात आंदोलकांमधील भारताचा कुस्तीपटू बजरंग पुनिया याने माध्यमांना माहिती दिली आहे. केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी आंदोलकांची भेट घेतल्यानंतर कुस्तीपटूंनी ही घोषणा केली आहे. दिल्लीच्या जंतर-मंतर मैदानावर गेल्या तीन दिवसांपासून कुस्तीपटूंनी रेसरल फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांच्याविरोधात आंदोलन पुकारले होते.

भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आणि प्रशिक्षकांकडून महिला कुस्तीपटूंचे लैंगिक शोषण होत असल्याचा गंभीर आरोप काही कुस्तीपटूंनी केला होता. यामध्ये भारतासाठी ऑलिम्पिक, राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये पदक मिळवणाऱ्या काही कुस्तीपटूंचा देखील समावेश आहे. काहींनी तर खेळाडूंना जीवे मारण्याच्या धमक्या दिल्याचा देखील आरोप केला आहे. या सर्व आरोपांमुळे कुस्तीपटूंचे आंदोलन देशात चर्चेचा विषय ठरले होते. मात्र आंदोलकांनी आरोप केलेले कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांनी मात्र आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. ब्रिजभूषण सिंह हे उत्तर प्रदेशमधील भाजपाचे एक प्रभावी नेते आहेत. सहा वेळा ते खासदार म्हणून निवडून आले आहेत. याआधी देखील ब्रिजभूषण सिंह एका व्हिडीओमध्ये वादात सापडले होते. त्यात २०२१ मध्ये एका शिबिरादरम्यान एका कुस्तीपटूला थोबाडीत मारल्याचा त्यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता.

दरम्यान, केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांनी आंदोलक कुस्तीपटूंची भेट घेऊन त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली. या चर्चेदरम्यान, आरोपांची चौकशी करण्यासाठी उच्चस्तरीय समितीची स्थापना करण्याचे आश्वासन त्यांनी आंदोलकांना दिले. या समितीतील सदस्यांची नावे शनिवारी जाहीर करण्यात येतील, असे देखील ठाकूर म्हणाले. येत्या ४ आठवड्यांत ही समिती आपली चौकशी पूर्ण करेल आणि त्याचा अहवाल सादर करेल, अशी माहिती अनुराग ठाकूर यांनी दिली आहे. दरम्यान, समितीची चौकशी पूर्ण होईपर्यंत ब्रिजभूषण सिंह यांना पदापासून दूर राहण्याचे आदेश भारतीय ऑलिम्पिक संघटनेने दिल्याचे सांगितले जात आहे.

https://twitter.com/ani_digital/status/1616542077424373761?s=20&t=ooH_iKOe7suoj7CbYLkZrg

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!