राज्यात नाशिकसह विविध ठिकाणी उद्योग क्षेत्र वाढीस लागावे यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील : ना. सामंत

नाशिक (प्रतिनिधी) :– राज्यामध्ये विजेची सवलत देण्याऐवजी उद्योजकांना अन्य मार्गाने सबसिडी देऊन नाशिक शहर सह राज्याच्या विविध भागांमध्ये उद्योग क्षेत्र वाढीस लागावे यासाठी राज्य सरकार प्रयत्न करीत असल्याची माहिती राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

अंबड इंडस्ट्रिज अँड मॅन्युफॅक्चरर असोसिएशनच्या वतीने आज आयमा सभागृहामध्ये बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीसाठी उद्योग मंत्री उदय सामंत नाशिकमध्ये आले होते. त्यांचे स्वागत आयमाचे अध्यक्ष निखिल पांचाळ, धनंजय बेळे, ज्ञानेश्वर गोपाळे, ललित बुब, वरूण तलवार आदींसह अन्य पदाधिकाऱ्यांनी केले.

या बैठकीसाठी पालकमंत्री दादा भुसे, खा. हेमंत गोडसे, महापालिका आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, सीआयआयए, लघु उद्योग भरती उद्योग आघाडी नाशिक इंजिनिअरिंग क्लस्टर, नाईस, निवेक, मालेगाव औद्योगिक संघटना आदींसह विविध संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीपूर्वी पत्रकारांशी बोलताना सामंत यांनी सांगितले की, संपूर्ण देशामध्ये उद्योग क्षेत्रात महाराष्ट्र राज्य हे प्रथम स्थानावर उद्योग निर्मितीसाठी आणि नवीन उद्योग येणारे राज्य ठरले आहे. परवा जो पाहणी अहवाल आला त्या पाहणी अहवालामध्ये हे स्पष्ट झाले असल्याचे सांगून ते म्हणाले की, राज्यामध्ये नवीन नवीन उद्योग येऊ पाहत आहे.

त्यांना अधिक सुविधा देण्यासाठी देखील राज्य शासन प्रयत्न करीत आहे. राज्यातून उद्योग बाहेर जात असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. परंतु, ते म्हणाले की, विजेच्या दरवाढीचे कारण देत असले तरीही प्रत्यक्षात राज्य शासनाकडून त्या मोबदल्यात विविध प्रकारच्या सवलती उद्योगांना दिल्या जातात. लवकरच वीज दरवाढी संदर्भामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून काहीतरी निर्णय घेतला जाईल.

नाशिक सह विविध भागांमध्ये नवीन उद्योजक यावेत तसेच नवीन उद्योग सुरू व्हावे यासाठी म्हणून उद्योग मंत्रालय प्रयत्न करीत आहे. त्यासाठी या ठिकाणी बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. नाशिकला भरीव उद्योग देण्यासाठी आम्ही प्रयत्न असे स्पष्ट करून त्या पुढे म्हणाले की, मोठे उद्योग येण्याबरोबरच महाराष्ट्रातील मध्यम आणि लघु उद्योजक देखील जगले पाहिजे. त्यांना काम करता आलं पाहिजे. कारण ते स्थानिक आहेत आणि स्थानिक उद्योगांना मदत करण्यासाठी राज्य सरकार वचनबद्ध आहे.

त्या दृष्टिकोनातून प्रयत्न केले जात आहे. त्यामुळे लघु आणि मध्यम उद्योग टिकण्यासाठी देखील सरकारकडून प्रयत्न केले जात असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. त्यासाठी वेगवेगळ्या योजना येणाऱ्या काळात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट करून सांगितले की लवकरच नाशिकमध्ये काही उद्योग येऊ पाहत आहेत.

सूत्रसंचालन राजेंद्र अहिरे यांनी केले तर आभार प्रदर्शन ललित बुब यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!