‘पारस पीव्हीसी पाईप व्यवसायातून नेत्रदीपक यश’

दहा ते पाच अशा चाकोरीबद्ध आणि मोजकेच उत्पन्न देणार्‍या चाकरीपेक्षा स्वत:चा व्यापार व्यवसाय केव्हाही उत्तम ठरतो. तरुणांनी नोकरीच्या मागे न धावता स्वयंरोजगाराकडे वळावे. नोकरीच्या चौकटबद्ध कामात अडकून घेण्यापेक्षा इतरांना रोजगार देण्याचे स्वप्न बघावे. तालुकास्तरावर अथवा छोट्या गावात व्यापार, व्यवसायासाठी तरुणांना मोठ्या संधी आहेत. स्वयंरोजगार हाच नव्या युगाचा मंत्र आहे, असे सांगत आहेत पीव्हीसी पाईप ट्रेडिंग व्यावसायात अल्पावधीत स्वत:चे स्थान निर्माण करणारे व्यावसायिक अजय मंचरकर…

पारस ट्रेडर्सचे ऑफिस

अजय मंचरकर यांनी इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरींगचा डिप्लोमा पूर्ण करुन काही काळ नोकरी केली. मात्र त्यांच्यातील व्यावसायिक, उद्योजकाला ती चौकटबद्ध चाकोरी मान्य नव्हती. व्यापार, उद्योगात काहीतरी नवीन करण्यासाठी त्यांचे अंर्तमन ओढ घेत होते. नोकरीतून मार्केटिंग, विक्री कौशल्य याची शिदोरी घेऊन ते तयार होत होते. या दरम्यान पारस कंपनीसाठी डिलर्स नेमणे आहे, अशी जाहिरात प्रसिद्ध झाली आणि त्यांनी नोकरी सोडून डिलर्सशीपच्या माध्यमातून व्यापारात उडी घेतली.

पिंपळगाव बसवंतसाठी ‘पारस’ची डिलरशीप त्यांनी स्वीकारली. हा तालुका शेतीप्रधान असल्याने शेतीशी निगडीत व्यवसाय चांगला चालेल, असे त्यांना वाटले आणि ही शक्यता खरी ठरणारी होती. पारस ही शेती क्षेत्रासाठी उत्पादने निर्मिती करणारी कंपनी असल्याने त्यांनी 1999 मध्ये पारस ट्रेडर्स नावाने अ‍ॅग्रीकल्चर क्षेत्रासाठी पीव्हीसी पाईप आणि शेती अवजारे, उपकरणे विक्री व्यापाराला दहा बाय दहाच्या छोट्याशा दुकानात सुरुवात केली.

प्रामाणिक व्यवहार, मृदू संभाषण, शेतकर्‍यांशी जुळलेले संंबंध आणि त्यांच्या अपेक्षा पूर्ण करणार्‍या व्यवहारामुळे अजय मंचरकर यांच्या पीव्हीसी पाईप आणि कृषी अवजार व्यापाराला शेतकर्‍यांनी मोठा प्रतिसाद दिला आणि त्यांच्या व्यापाराचा आलेख उंचावत गेला. यासाठी त्यांच्या अंगी असणारी नम्रता, ग्राहकांशी मृदू संभाषण आणि पारदर्शी, प्रामाणिक व्यवहाराचे गुण कामी आले. यामधून त्यांचा व्यापार विस्तार होत गेला आणि प्रारंभी रिटेल व्यवसायातून त्यांना होलसेल व्यापाराची कवाडे खुली झाली.

2008 मध्ये गंगापूर रोडवरील आकाशवाणी केंद्राजवळ याच व्यवसायाचा विस्तार झाला आणि तिथे एक भाड्याचा 1000 स्वे. फूटाचा गाळा घेऊन होलसेल माकेॅटमध्ये पाऊल ठेवले. त्यानंतर व्यवसाय फुलत, बहरत गेला. पारस ट्रेडर्सच्या माध्यमातून ते रिटेल मधून होलसेल विक्री व्यापारात आले. त्यानंतर मग त्यांनी नवीन ग्राहक जोडले; तसे व्यापारामध्येही एकेक प्रॉडक्टची भर घालत गेले. प्रारंभी शेतकी पाईप आणि अवजारांसोबत नंतर पुढे त्यांनी प्लंबिंगसाठी लागणारे पाईप्स, प्लास्टिक साधने आणि नंतर प्लास्टिक मिरॅकल प्रॉडेक्टचे न तुटणारेप्लास्टीक उत्पादने, वॉटर टँक अशी नवीन उत्पादने व्यापारासाठी विस्तार करत गेले. यातून वर्षभर ग्राहकांना सेवा देण्यासाठी ते सज्ज होत गेले. असेच पूढचे पाऊल टाकत त्यांचा प्रवास सीपी अ‍ॅण्ड सिरॅमिक(नळ, सॅनिटरी भांडे) उत्पादनाचाही व्यापार करण्यापर्यंत विस्तारत गेला. सिरॅमिक उत्पादनात बेसिन, वॉल पॅनल, शॉवरपॅनल, डब्ल्यूबीसी पॅनल, झॅक्यूजी प्रॉडक्ट यांच्याही व्यापारात ते उतरले. आज त्यांची मुलेही त्यांना मदत करण्यासाठी व्यवसायात उतरले आहेत. त्यांचा मोठा मुलगा क्‍लिनिंग एजन्सीच्या माध्यमातून वडिलांच्या पावलावर पाऊल ठेऊन नवीन काही करण्यास सज्ज झाला आहे.

संघर्ष,संकटे अन् अपडाऊन सुरूच राहणार..
अजय मंचरकर यांना व्यापारात अनेक संघर्ष, संकटे आलीत. मात्र त्यावर मात करुन त्यांनी यशाची पायवाट सुरूच ठेवली. 2008 साली नाशिकमध्ये गोदावरी नदीला महापूर आला. त्यावेळी आकाशवाणीजवळील त्यांच्या गोडावूनमध्ये पुराचे पाणी घुसले. संपूर्ण गोडाऊनच्या वर पाच फूटांपर्यंत पुराच्या पाण्याने हाहाकार केला. अजयजींच्या पत्राच्या गोडाऊनमधून प्रचंड वेगाने पाणी जाऊनही त्यांच्या गोडाऊनमधील उत्पादनांला फारशी झळ पोहोचली नाही. असा चमत्कार झाला यासाठी व्यवहारातील चांगुलपणा आणि लोकांच्या सदिच्छा कोणत्या ना कोणत्या गोष्टीने तुम्हाला मदत करत असतात, असे सांगून व्यवसायाचे फारसे नुकसान झाले नाही, असे ते नमूद करतात. कोविड लॉकडाऊन काळातही जगासोबत व्यवसायाला झळ बसली. आपले लोक कोण आणि परके कोण याची नव्याने ओळख झाली. मात्र संकट काळात आपल्या लोकांचे महत्व पुन्हा अधोरेखित झाले, असे ते सांगतात. व्यवसायातील कर्मचारी आणि मोठ्यांच्या आशीर्वादाने यातून बाहेर येण्याचे बळ मिळाले असेही ते सांगतात.

नवी क्षितीजे-नवी आव्हाने…
पारस ट्रेडर्समधून यशस्वी व्यापाराचा यशस्वी प्रवास सुरू असताना अजय मंचरकर यांना उद्योजकतेची नवी क्षितीजे खुणावत आहेत. ट्रेडींग व्यवसायात अनुभव घेऊन ,त्यानंतर आगामी काळात फूड प्रॉडक्ट निर्मिती किंवा पीव्हीसी पाईप निर्मिती उद्योगात उतरणार असल्याची मनिषा ते बोलून दाखवतात. आज यशाच्या शिखरावर असताना त्यासाठी कर्मचारी वर्गाचे योगदान महत्वपूर्ण असल्याचे ते विनम्रपणे नमूद करतात. 15 ते 20 वर्षांपासून आपण स्टाफ टिकवून ठेवला आहे असे सांगून उद्योग, व्यापारात टीमवर्क, मनुष्यबळाचे सहकार्य मोलाचे असते असे ते मानतात. अत्यंत शांत प्रवृत्ती, जिभेवर साखर आणि डोक्यावर बर्फ ठेऊन माणसांशी सुसंवाद ठेवल्यास कुठल्याही व्यवसायात यश दूर नाही असे ते सांगतात. राग, चिडचिडेपणा, त्रागा, संताप हे यशासाठी मोठे शत्रू असल्याचे ते सांगतात. प्रेमाने, आपुलकीने माणसे जोडून कामे करुन सर्वत्र सकारात्मक आणि आंनदी वातावरण निर्मितीने निर्मितीक्षमता, अभिनवता वाढत जाते, यावर अजय मंचरकर यांचा ठाम विश्‍वास आहे आणि तसेच वातावरण त्यांनी आपल्या व्यवसायात सर्वच ठिकाणी नियमित केले आहे.

स्वयंरोजगाराकडे वळा..
नवीन पिढीकडे अत्याधुनिक तंत्रज्ञान, आकलनक्षमता आणि प्रचंड ऊर्जा आहे. याशक्तीस्थानाचा उपयोग करुन जगाशी स्पर्धा करुन तरुणाईने प्रचंड मेहनतीने उद्योजकतेकडे वळावे. यशाचा मार्ग खडतर असला तरी असाध्य नाही असे सांगून प्रामाणिक, पारदर्शी व्यवहार, नितीमत्ता आणि मूल्य यामुळेच व्यवसायात यशाची कमान चढत जाते असे ते सांगतात. तुम्ही चांगले वागाल तर लोकही तुमच्याशी चांगुलपणाने वागतात असे ते नमूद करतात.
सामाजिक क्षेत्रातही योगदान…

अजय मंचरकर यांना विकास, प्रगतीत ज्यांनी योगदान दिले त्यांच्यासाठी काहीतरी करणे हे आपण देणे लागतो ,याची जाणिव नेहमीच असते. याच जाणिवेतून त्यांनी प्लंबर लोकांसाठी विमा योजना राबविली. पारस ट्रेडर्सतर्फे ते प्लंबर लोकांना नेहमीच मदत करतात. त्यासाठी प्रशिक्षण, कार्यशाळा ते घेतात. जैन सोशल गु्रप सेंट्रलचे ते माजी अध्यक्ष असून आता या संघटनेतून त्यांनी आदिवासी पाड्यावरील विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप, जल पुनर्भरण उपक्रम, गोरगरिबांना ब्लॅकेट वाटप, सॅनीटरी नॅपकीन डिस्पोजल मशिन बसवून देणे, वृक्षारोपण कार्यक्रमात पाण्याची व्यवस्था करुन देणे, विद्यार्थ्यांना सायकल वाटप या आणि अशा अनेक उपक्रमात ते सक्रिय योगदान देत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!