पिंपरी चिंचवड (भ्रमर वृत्तसेवा) :- प्रातिनिधीक स्वरुपात मोटारसायकलची चावी घेण्यासाठी व्यासपिठावर आलेल्या पोलीस उपायुक्तांची शरीरयष्टी पाहून उपमुख्यमंत्री ना. अजित पवार यांनी व्यासपिठावरच पोलीस आयुक्तांसमोर जरा बारीक व्हा, असा सल्ला उपायुक्तांना दिला.

अजित पवारांच्या हस्ते पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या मुख्य इमारतीत फायर फायटर बाईक आणि पोलिसांना गस्त घालण्यासाठी अत्याधुनिक बाईक देण्यात आल्या. यावेळी पोलीस आयुक्तालयातील डीसीपी डॉ. काकासाहेब डोळे हे व्यासपीठावर प्रातिनिधीक चावी स्वीकारण्यासाठी आले होते. त्यांनाच उद्देशून ना. पवार यांनी उपायुक्त डोळे यांना जरा बारीक व्हा, असा सल्ला दिला.
पोलिसांनी तंदुरुस्त राहावे यासाठी आपण आर आर पाटलांच्या काळात पोलिसांसाठी फिटनेस भत्ता सुरु केला याची आठवणही त्यांनी करुन दिली. या कार्यक्रमात पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, पालिका अधिकारी उपस्थित होते.