देवळाली कॅम्प :- अमरनाथ यात्रेमध्ये शुक्रवारी सांयकाळच्या सुमारास ढगफुटी झाल्याने ५ यात्रेकरूंचा मृत्यू तर काही यात्रेकरू जखमी तर अनेक यात्रेकरू बेपत्ता बातमी विविध चॅनलवर प्रसिद्ध होताच देवळालीसह नाशिक जिल्हाभरातून या यात्रेसाठी शेकडो नागरिक गेलेले असल्याने त्यांच्या नातेवाईकांमध्ये चिंतेचे वातावरण दिसून येत होते.

मात्र, हे सर्व यात्रेकरू सुरक्षित असल्याची माहिती खुद्द यात्रेकरूंनी त्यांच्या कुटुंबियांना दिली आहे. दरम्यान देवळाली कॅम्प मधून मागील आठवड्यात सुमारे १२६ यात्रेकरू अमरनाथसाठी रवाना झाले होते. येथील मुख्य गुफा परिसरात दर्शन करून पहाटे ३ वाजेच्या सुमारास हे सर्व यात्रेकरू परतीच्या मार्गावर प्रवासास लागले आहेत.

देवळालीच्या यात्रेकरुंसह नाशिकमधील पाथर्डी, इंदिरानगर, नांदगाव, मनमाड, इगतपुरी आदी भागातील नागरिक देखील सहभागी झाले होते. ते सर्व देखील सुरक्षित असून जम्मूच्या दिशेने त्यांचा परतीचा प्रवास सुरु आहे.
बाबा अमरनाथ गुफेजवळ ढगफुटीची वार्ता समजताच यात्रेला आलेल्या भाविकांच्या घरच्यांचे फोन आले. मात्र आम्ही परतीच्या प्रवासाला जवळपास असल्याने जवळपास ३०० किलोमीटर जम्मूच्या दिशेला असून देवळाली कॅम्प परिसरातील संसरी, शिगवा, शेवगे दारणा, नाशिकरोड भागातील जवळपास सर्व सोबतचे यात्रेकरू सुखरूप असल्याचे भाविक सतीश कांडेकर यांनी सांगितले.