अंबड येथील सामाईक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाचे काम तत्काळ सुरू करावे : उद्योगमंत्री सुभाष देसाई

मुंबई :- औद्योगिक वसाहत नाशिक येथे होणारा सामाईक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पासंदर्भातील उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार गोदावरी नदीचे प्रदूषण होऊ नये यासाठी प्रकल्पाचे काम गतीने सुरू व्हावे अशा सूचना अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिल्या आहेत. तर महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने सर्वसामान्यांचे हित लक्षात घेवून या कामाला तात्काळ सुरूवात करावी, असे निर्देश उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिले आहेत.

मंत्रालयातील दालनात उद्योगमंत्री सुभाष देसाई आणि अन्न, नागरी पुरवठा, व पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत अंबड महाराष्ट्र औद्योगिक वसाहत येथे सामाईक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारण्याबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पी. अन्बलगन, सह मुख्य कार्यकारी अधिकारी  अजित पाटील, नाशिक महापालिकेचे आयुक्त कैलास जाधव, सहसचिव संजय देगावकर, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे मुख्य वैज्ञानिक अधिकारी डॉ.अमर सुपाते, मुख्याधिकारी एस.आर.तुपे यासह इतर अधिकारी बैठकीला उपस्थित होते.

उद्योगमंत्री श्री.देसाई म्हणाले, अंबड महाराष्ट्र औद्योगिक वसाहत, नाशिक येथे होणाऱ्या सामाईक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाबाबत वैज्ञानिक अधिकारी डॉ.सुपाते यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या समितीने या प्रकल्पाबाबत अनुकूल अहवाल दिला आहे. या अहवालातील सूचना लक्षात घेवून औद्योगिक विकास महामंडळाने त्याप्रमाणे कार्यवाही करावी. कोणत्याही प्रकारे या कामात दिरंगाई न करता शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करून या कामाला प्राधान्य द्यावे, अशा सूचना यावेळी श्री.देसाई यांनी दिल्या.

प्रकल्प पूर्ण करताना समितीने दिलेल्या सूचनांचेही पालन केले जावे : छगन भुजबळ

अन्न, नागरी पुरवठा मंत्री श्री.भुजबळ म्हणाले, अंबड महाराष्ट्र औद्योगिक वसाहत, नाशिक येथे होणाऱ्या सामाईक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाचे काम होताना नदीतील पाण्याचे प्रदूषण होता कामा नये. तसेच नदीच्या पाण्याची शुध्दता रहावी यासाठी सर्व यंत्रणांनी दक्षता घ्यावी. कारण हा प्रश्न लोकाच्या आरोग्याशी संबंधित आहे. हा प्रकल्प राबविणाऱ्या यंत्रणांनी कामाला प्राधान्य द्यावे दिलेल्या वेळेत हा प्रकल्प पूर्ण करताना वैज्ञानिक अधिकारी डॉ.सुपाते यांच्या समितीने दिलेल्या सूचनांचेही पालन केले जावे, अशा सूचना यावेळी श्री.भुजबळ यांनी दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!