नाशिक :- शुभम पार्क समोर गाड्यांच्या व दुकानांच्या काचा फोडून दहशत माजवणाऱ्या सराईत गुन्हेगारांच्या टोळीतील 3 जणांच्या अवघ्या अर्ध्या तासात अंबड पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी, की शुभम पार्क समोर गाड्यांच्या व दुकानांच्या काचा फोडून अज्ञात इसम पळून गेले होते. अंबड पोलीस त्यांचा शोध घेत असताना वैभव रणजित लोखंडे (वय 19, रा. अंबड), वैभव गजानन खिरकाडे (वय 28, रा. मेहेरधाम), अविनाश शिवाजी गायकवाड (वय 32, रा. शुभम पार्क, सिडको), ओमप्रकाश पवार (रा. पाथर्डी गावाजवळ), प्रणय बाबुराव हिरे (रा. सिडको), केतन गणेश भावसार (वय 19, रा. राजरत्न नगर) यांनी ही तोडफोड केल्याचे गुप्त बातमीदारा मार्फत पोलिसांना समजले. या आरोपींपैकी वैभव लोखंडे, वैभव खिरकाडे व अविनाश गायकवाड या तिघांना पोलिसांनी अर्ध्या तासात ताब्यात घेत त्यांच्या जवळ असलेला लोखंडी कोयता ताब्यात घेतला आहे. या आरोपींविरुद्ध विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.

ही कारवाई पोलीस आयुक्त दिपक पांडेय, उपायुक्त विजय खरात, सहाय्यक आयुक्त सोहेल शेख, अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भगीरथ देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्रीकांत निंबाळकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश शिंदे, पोलीस नाईक किरण गायकवाड, पोलीस शिपाई अनिरुद्ध येवले, नितीन सानप, हेमंत आहेर, मच्छिनद्र वाकचौरे, जनार्दन ढाकणे, प्रमोद काशीद, योगेश शिरसाठ, मुकेश गांगुर्डे, जाधव व प्रशांत नागरे यांनी केली.