अमेरिका : गोळीबाराच्या घटनेने अमेरिका पुन्हा एकदा हादरली आहे. अमेरिकेमधील कॅलिफोर्नियामध्ये दोन दिवसांत गोळीबाराच्या दोन मोठ्या घटना समोर आल्या आहेत. सोमवारी (दि. २३) संध्याकाळी हाफ मून बे भागामध्ये गोळीबाराची घटना घडल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून सातत्याने अमेरिकेमधून गोळीबाराच्या घटना समोर येत आहेत. कॅलिफोर्नियामध्ये सोमवारी झालेल्या गोळीबारात एकूण ९ जणांचा मृत्यू झाला असून पोलिसांनी या घटनेमधील संशयिताला ताब्यात घेतले आहेत. सॅन मेंटो येथील पोलीस मुख्यालयाने जारी केलेल्या निवेदनानुसार, सॅन फ्रान्सिस्कोच्या दक्षिणेस ३० मैल अंतरावर हाफ मून बेजवळ एका महामार्गावर गोळीबाराची घटना घडली होती.

सॅन मेंटो पोलिसांनी सांगितले आहे की, अमेरिकेमध्ये गोळीबाराच्या दोन वेगवेगळ्या घटना घडल्या आहेत. तसेच, अमेरिकेमधील आयोवा येथील डेस मोयनेस शहरामधील एका शाळेत सोमवारी झालेल्या गोळीबारामध्ये दोन विद्यार्थी ठार झाले आहेत, तर एक शिक्षक गंभीर जखमी झाला आहे. डेस मोयनेस पोलिसांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमी शिक्षकाची प्रकृती देखील चिंताजनक आहे.
या घटनेबाबत कॅलिफोर्नियाच्या स्थानिक नेत्यांनी ट्वीट केले की, आमच्या स्थानिक जिल्ह्यामध्ये गोळीबारामुळे झालेल्या लोकांच्या मृत्यूबद्दल अतिव दुःख झाले, यासाठी आम्ही स्थानिक प्रशासनाला शक्य ती मदत करण्याचा प्रयत्न करू.
कॅलिफोर्नियामध्ये दोन दिवसांतील ही तिसरी घटना आहे, ज्यामध्ये ४ जणांचा मृत्यू झाला आहे. यापूर्वी रविवारी (दि. २२) कॅलिफोर्नियामधील लॉस एंजेलिसमधील मॉन्टेरी पार्कमध्ये चिनी नववर्षाच्या सेलिब्रेशनमध्ये झालेल्या गोळीबारामध्ये १० जणांचा मृत्यू झाला होता. या गोळीबारामध्ये अनेक जण जखमी झाले होते. या घटनेनंतर बचावकार्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. हल्ल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी कॅलिफोर्नियातील गोळीबारामध्ये मारल्या गेलेल्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी अमेरिकेचा ध्वज एका दिवसासाठी खाली ठेवण्याचे आदेश दिले होते.