पाण्यात पोहून जात वीज सुरळीत करणारे कर्तव्यदक्ष वीज कर्मचारी अमोल जागले यांना विजेचा तीव्र शॉक

 

इगतपुरी (भास्कर सोनवणे) :- इगतपुरी तालुक्यातील रायांबे येथे नदीत पोहत जाऊन विजेच्या खांबावर चढत नागरिकांना तत्पर सेवा देणाऱ्या कर्तव्यदक्ष वीज कर्मचाऱ्याचा विजेच्या झटक्याने अपघात झाला आहे. भर पावसाळ्यात जिवावर खेळुन कर्तव्य बजावणारे वीज कर्मचारी अमोल जागले यांना ह्या अपघातात भाजल्याने गंभीर दुखापत झाली असल्याचे वृत्त आहे.

घोटीच्या जवळच उच्च दाबावरील विजेच्या खांबावर शॉक लागल्याने ही घटना काल घडली. भाजल्यामुळे पोटावर गंभीर इजा झाली असुन एक पाय कायमस्वरुपी निकामी झाला आहे. नासिकच्या खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु असून परिस्थिती चिंताजनक असल्याचे समजते.

भर पावसाळ्यात अर्धा किमी पाण्यात पोहुन जाऊन खांबावर चढत वीज पुरवठा सुरळीत करणाऱ्या ह्या कर्तव्यदक्ष जवानाचा व्हिडीओ प्रसारमाध्यमांतुन झळकला होता. त्याबाबतीत https://bit.ly/3otCgpK ह्या लिंकवर बातमी उपलब्ध आहे. अमोल जागले यांच्यावर सर्व स्तरातुन कौतुकांचा वर्षाव होऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बहुमान केला. आपल्या कर्तव्याशी प्रामाणिक राहुन सेवा देणाऱ्या ह्या तरूणाच्या जीवनात अंधकार आला असुन पाय गमवावा लागला आहे.

गरीब आदिवासी कुटुंबातील अल्पशा पगारावर हंगामी स्वरुपात काम करणाऱ्या या तरुणाला मदतीची गरज आहे. अमोल जागले यांच्यासाठी इगतपुरी तालुक्यातून दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केल्या जात आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!