नवी दिल्ली : छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल भाजप नेत्यांकडून सातत्याने वादग्रस्त वक्तव्ये होत असताना यासंदर्भात संसदेने खास कायदा करावा, अशी मागणी करण्यासाठी राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे लोकसभेत बोलण्यासाठी उभे राहिले. परंतु त्यांच्या ३ वाक्यानंतरच त्यांचा माईक बंद करुन पीठासीन अधिकारी राजेंद्र अग्रवाल यांनी त्यांचा आवाज बंद केला. ‘छत्रपती शिवराय देव नाहीत पण देवापेक्षा आम्हाला कमी नाहीत. त्यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्ये करण्याची कुणाची हिम्मत होता कामा नये’, असे अमोल कोल्हे सांगत असतानाच पीठासीन अधिकारी राजेंद्र अग्रवाल यांनी “हो गया हो गया…” म्हणत विषय पूर्ण करण्याची सूचना केली. त्यानंतर पुढच्याच सेकंदाला अमोल कोल्हे यांचा माईक बंद करण्यात आला. संसदेमध्ये घडलेल्या प्रकारानंतर अमोल कोल्हे यांनी संताप व्यक्त केला.
संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला बुधवारपासून सुरुवात झाली आहे. अधिवेशाचा आज दुसरा दिवस आहे. गेल्या काही दिवसांपासून भाजप नेते आणि शिंदे गटाच्या नेत्यांकडून शिवरायांबद्दल अवमानकारक वक्तव्ये होत असल्याने राज्यामध्ये संतापाची लाट निर्माण झाली आहे. याचे पडसाद नवी दिल्लीमध्ये देखील पाहायला मिळाल आहे. मविआ खासदारांच्या निदर्शनानंतर आज राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी ‘शून्य प्रहारा’मध्ये शिवरायांबद्दल सातत्याने वादग्रस्त वक्तव्ये होत असताना यासंदर्भात संसदेने खास कायदा करावा, अशी मागणी केली होती. पण त्याचवेळी त्यांचा माईक बंद करण्यात आला.

छत्रपती शिवाजी महाराज फक्त महाराष्ट्राचे नाही तर उभ्या हिंदुस्थानाचे दैवत आहेत. अनेक सरसेनापतींनी, राजा-महाराजांनी छत्रपती शिवरायांकडून प्रेरणा घेतली. आम्हा शिवभक्तांसाठी छत्रपती शिवराय देव नाहीयेत. पण देवापेक्षा कमी देखील नाहीयेत. असे असताना महाराष्ट्रात सातत्याने छत्रपती शिवरायांबद्दल अवमानकारक वक्तव्ये केली जात आहेत, असे आक्रमकपणे आणि पोटतिडकीने अमोल कोल्हे बोलत होते. तेवढ्यात पीठासीन अधिकारी राजेंद्र अग्रवाल यांनी ‘हो गया.. हो गया..’ म्हणत अमोल कोल्हेंना खाली बसण्याची सूचना केली. त्यानंतर अमोल कोल्हेंचा जरासा पारा चढला. “हमें बोलने दिजीए…” म्हणत त्यांनी आपले म्हणणे अधिक त्वेषाने मांडण्याचा प्रयत्न केला. परंतु अमोल कोल्हेंचा आक्रमक पवित्रा पाहून त्यांचा माईकच बंद करण्यात आला.
“मी जो विषय मांडणार होतो, त्या विषयाला शून्य प्रहारामध्ये वेळ देण्यात आला होता. परंतु वेळ देऊनही मला बोलू दिले नाही. माझा आवाज दाबला गेला. माझे बोलणे सुरु झाल्यावर अवघ्या दोन ते तीन वाक्यानंतर मला खाली बसण्याची सूचना केली. हो गया हो गया म्हणत माझा माईक बंद केला.. माझा आवाद दाबला असेल पण शिवभक्तांच्या आवाजाने तुमच्या कानठळ्या बसल्याशिवाय राहणार नाहीत”, असा इशारा देत अमोल कोल्हेंनी संसेदत घडलेल्या प्रकाराबद्दल संताप व्यक्त केला.
https://twitter.com/Adhav_Akshay1/status/1600773434069303296?s=20&t=OB6I7vj4hacjZEYFViHcIw