दुर्दम्य इच्छाशक्तीने 8 वर्षीय अंशूलने घातली विश्‍वविक्रमाला गवसणी

नाशिक (प्रतिनिधी) :- जगातील पाचव्या आणि आशिया खंडातील पहिल्या क्रमांकाचे सर्वोच्च शिखर कृत्रिम ऑक्सीजनशिवाय पार करत जगातील सर्वात लहान गिर्यारोहक ठरलेल्या अंशूल वैजनाथ काळे या अवघ्या सात वर्ष अकरा महिन्याच्या बालकाने विश्‍वविक्रमाला गवसणी घातली आहे. मात्र प्रेमळ काळीज आणि कणखर प्रशिक्षक अशा दुहेरी भूमिका पार पाडलेल्या वैजनाथ काळे यांच्यातील प्रशिक्षकाचा विजय झाला आणि शेवटच्या टप्प्यावर आपला मुलगा शारिरीक आव्हानांवर मात करु शकेल असा आत्मविश्‍वास त्यांनी शिष्यामध्ये पेरून प्रशिक्षकाचा विश्‍वास सार्थ ठरवला.

ही कहाणी आहे, अंशुल वैजनाथ काळे या दुर्दम्य इच्छिशक्ती असलेल्या बालकाची आणि त्याच्या प्रशिक्षक असलेल्या वडिलांची. अंशुलने नुकतेच आफ्रिका खंडातील टांझानियामधील 19 हजार 341 फूट उंचीचे किलिमंजारो शिखर वडिलांसोबत विना कृत्रिम ऑक्सिजनशिवाय पार करुन जगातील सर्वात लहान गिर्यारोहक होण्याचा विश्‍वविक्रम नोंदवला. याआधी सर्वात लहान वयाच्या गिर्यारोहक बालकाला कृत्रिम ऑक्सीजन लावावा लागला होता.

एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे यांच्या 360 एक्स्प्लोरर व अबेकोम्ब्बे टूर्स यांच्या संयुक्त मोहीमेतून या पितापूत्राने हा सर्वोच्च शिखर पादाक्रांत केला. ही मोहीम पाऊस, घोंगावणारे वारे, हिमपात आणि जंगलातील आव्हानात्मक अशा प्रतिकूल परिस्थितीचा सामना करत पार पाडावी लागते. अंगावर येणारी चढण, वारा, पाऊस तर पुढील टप्प्यात बर्फ पडतो या सर्व आव्हानांवर मात करुन अंशुल या छोट्या बालकाने हे सर्वोच्च शिखर पादाक्रांत कृत्रिम ऑक्सिजनचा वापर न करत हे शिखर पार करणारा जगातील सर्वांत लहान गिर्यारोहक या विश्‍वविक्रमावर नाव कोरले.

अंशूल चार वर्षांचा होता तेव्हापासून वडिलांसोबत गिर्यारोहण करतो. पाच वर्षांचा असताना त्याने कळसूबाई हे राज्यातील सर्वोच्च शिखर पादाक्रांत केले. त्यानंतर जगातील सर्वोच्च एव्हरेस्टवर चढाई करण्याचे त्याच्या मनात होते. परंतु त्याच्या वडिलांनी त्याच्यासाठी प्रथम किलिमंजारो हे पार करण्यासाठी मोहीम आखली. यामध्ये शेवटच्या टप्प्यामध्ये विरळ ऑक्सीजन स्तरामुळे अंशूलला उलटीचा त्रास झाला. आता मोहिम असफल होणार असे त्याचे वडिल आणि प्रशिक्षक वैजनाथ काळे यांना वाटले. पुढे तो जाऊ शकणार नाही असे सोबतच्या तज्ज्ञांनी सांगितले. मात्र वडिलांंमध्ये असलेल्या प्रशिक्षकाने अंशूलमध्ये जिद्द पेरली आणि प्रचंड इच्छाशक्तीने आपण हे शिखर पार करु शकतो असे अंशूलने ठरवले. मनाच्या शक्तीसमोर शरीराच्या शक्तीनेही साथ दिली आणि शारिरीक आव्हानांचा सामना करुन अंशूलने शेवटचे टोक गाठून शिखराला गवसणी घातली.

या यशोगाथेत वडिल आणि मुलाचे भावनिक बंध, एका प्रशिक्षकाचा आपल्या शिष्यावरील प्रचंड विश्‍वास आणि अनेक भावनिक कंगोरेही होते. एकीकडे आपल्या मुलाच्या अस्वस्थतेमुळे तो पुढे चढाई करु शकेल का ही पित्याची काळजी आणि दुसरीकडे त्यांच्यातील प्रशिक्षकाला शिष्याबद्दल असलेला विश्‍वास यांच्या लढाईत पित्यापेक्षा प्रशिक्षक सरस ठरला आणि अंशूल नावाप्रमाणे सूर्याच्या पहिल्या किरणांच्या उगवत्या वेळी सर्वोच्च स्थानावर शिखर काबिज करणारा विश्‍वविक्रमी छोटा गिर्यारोहक ठरला.

प्रशिक्षकरुपी पित्याच्या डोळ्यांत आनंदाश्रू
अंशूलचे वडिल वैजनाथ काळे यांनी आजवर अनेक खेळाडूंना घडवले. कुणासाठीही हळवे भावनिक ते झाले नाही. मात्र अंशूलच्या प्रकरणात ते प्रशिक्षक होतेच पण एक वडिलही होते.

आजवर कुठल्याही शिष्यासाठी माझ्या डोळ्यात पाणी आले नाही, मात्र माझ्या मुलाने केलेली कामगिरी पाहता आम्ही जेव्हा अडचणींवर मात करुन सर्वोच्च शिखरावर होतो तेव्हा माझ्या डोळ्यांतून आलेले आनंदाश्रू मी आवरु शकलो नाही, अशी भावनिक प्रतिक्रिया वैजनाथ काळे यांनी दिली.

अंशूलवर शुभेच्छांचा पाऊस
दुर्दम्य इच्छाशक्तीने विश्‍वविक्रमावर नाव कोरणार्‍या अंशूल काळेचा भारतात आल्यावर अनेक ठिकाणी सत्कार करण्यात आला. तो फ्रावशी अ‍ॅकडमीचा विद्यार्थी असून तिथे त्याचे जंगी स्वागत आणि सत्कार करण्यात आला. अंशूल राहत असलेल्या सोसायटीच्या इमारतींवर त्याच्या विश्‍वविक्रमांचे आणि अभिनंदनाचे फलक, बॅनर्स आजही झळकत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!