नाशिक (प्रतिनिधी):- ज्वेलर्स दुकानासाठी हॉलमार्किंग सेंटर कारखाना सुरू करण्यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळाचे संमतीपत्र देण्याच्या मोबदल्यात 30 हजार रुपयांची लाच स्वीकारताना दोन अधिकार्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदार यांना हॉलमार्किंग सेंटरचा कारखाना सुरू करावयाचा होता. त्यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळाचे संमतीपत्र देण्याच्या मोबदल्यात प्रदूषण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी प्रवीण मनोहर जोशी व क्षेत्र अधिकारी कुशल मगन्नाथ औचरमल यांनी प्रत्येकी 15 हजार रुपये असे एकूण 30 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. तक्रारदार यांनी याबाबत लाचलुपच प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती.

त्यानुसार पथकाने काल उद्योग भवन येथील महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या प्रादेशिक कार्यालयात सापळा रचून 30 हजार रुपयांची लाच घेताना दोघांना रंगेहाथ पकडले. त्यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988 चे कलम 7 प्रमाणे गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.