मुंबई : चंद्रकांत पाटील यांनी केलेले वक्तव्य हा त्यांचा निर्णय नसून त्या तत्कालीन पदाधिकार्यांच्या मनातील भावना आहेत. पाटील यांनी फक्त त्या व्यक्त केल्या, असे मत भाजप नेते आशिष शेलार यांनी व्यक्त केले.

मनावर दगड ठेवून एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केले, या चंद्रकांत पाटील यांच्या वक्यव्यानंतर राजकीय वर्तुळात एकच चर्चा सुरू झाली. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज पनवेल येथे आयोजित भाजपच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत वरील वक्तव्य केले. त्यांच्या या वक्तव्यानंतर आता राजकीय चर्चांना उधाण आले आहे. यावरूनच आशिष शेलार यांनी चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या वक्तव्यानंतर सारवासारव करण्याचा प्रवत्न केला.

पाटील यांनी बैठकीत केलेलेभाषण बाहेर कसं आलं? हे पाहत आहोत, तो आमचा अंतर्गत प्रश्न आहे, असे आशिष शेलार म्हणाले. याबरोबरच संभाजीनगर, धाराशिव हे नामकरण, गणेशोत्सव, दहीहंडी, मोहरमच्या सणांवरील निर्बंध हटवण्याचे निर्णय नव्या सरकारने घेतले. आगामी निवडणुकांसाठी भाजपने व्यूवहरचना आखली आहे. ज्या बूथवर कमी मतदान झाले आहे, त्या ठिकाणी मतदान वाढवण्यासाठी काम करणार आहोत. ग्राम पंचायत आणि जिल्हा परिषद निवडणुकीत हा विचार घेऊन जाणार आहोत, असेही शेलार यांनी सांगितले.